मसुरे (मालवण) : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकात एकविसाव्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले. (क्षणचित्रे बातमीच्या शेवटी)
मसुरे शाळेतील उपशिक्षक श्री. ताम्हणकर, यांनी लिहिलेल्या ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन कोमसाप, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि पंचायत समितीचाच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मसुरे येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील या मूल्यसंस्कार कथा विद्यार्थ्यांच्या जीवनात सहजगत्या बदल घडवून आणतील, असे सांगून ते पुढे म्हणाले, आजच्या युगात मूल्ये हरवत चालली आहेत, असे म्हणतात. पण गुरुनाथ ताम्हणकर यांच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभले आणि त्यांनी हे पुस्तकातील मूल्यसंस्कार कथनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले तर पुढील पिढ्या निश्चितच संस्कारक्षम होतील.
यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख नारायण देशमुख, अशोक बागवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीताराम लाकम, सुगंधा गुरव, अरुण भोगले, हिर्लेकर गुरुजी, चंद्रशेखर धानजी, श्रुती गोगटे, सुरेंद्र सकपाळ, मनाली फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन हिर्लेकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. (ई-बुक लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)
कार्यक्रमाचे प्रास्तविक लेखक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. त्यांनी कोमसापच्या साहित्यिक मार्गदर्शनाचे तसेच जिल्हा शिक्षण संस्था, शिक्षण विभागाचे विशेष आभार मानले. सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, नारायण देशमुख, अरुण भोगले, अशोक बागवे यांनी आपले विचार मांडले. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शर्वरी शिवराज सावंत, प्रशांत पारकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.
पुस्तकाला यशश्री ताम्हणकर हिचे बालसुलभ मुखपृष्ठ लाभले असून तेजल ताम्हणकर यांनी पुस्तकाचे नेटके संपादन केले आहे. प्रस्तावना शिवराज सावंत यांची असून पुस्तकाचे प्रकाशन रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशन संस्थेने केले आहे. प्रकाशन समारंभाला पालक, ग्रामस्थ, केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. तेजल ताम्हणकर यांनी केले, तर आभार सौ. कविता सापळे यांनी मानले.
‘मूल्यसंस्कार’ ई-बुक लिंक :
वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी : https://books.google.co.in/books?id=JXBzEQAAQBAJ
अँड्रॉइडसाठी : https://play.google.com/store/books/details?id=JXBzEQAAQBAJ
प्रकाशन समारंभाची क्षणचित्रे
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




