Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

गावातल्या मुलांना रोजगार देणाऱ्या कंपनीविरोधात ग्रामसभा फक्त आपल्याकडेच होते : पालकमंत्री डॉ. सामंत

Advertisements

रत्नागिरी : ‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीत आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डॉ. उदय सामंत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अन्य अधिकारी आणि मान्यवर या वेळी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी प्रास्ताविकामध्ये अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

या वेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्पांसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरली, संपूर्ण गावाला सोबत घेऊन काम केले, तर सगळीच्या सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो. आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्राने बघितले पाहिजे, यासाठी एकदिलाने काम करावे. १०० दिवसांचे अभियान महत्त्वाचे असून, समाजाप्रति आपल्याला काहीतरी काम करायचे आहे, या भावनेतून सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी या अभियानात काम करावे.’ हा कार्यक्रम आपण घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

‘आणखी काही गावे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर आणायची असतील, तर स्वच्छता असणे गरजेचे आहे. तिथे ५०-५० घरांमध्ये न्याहरी निवास योजनेचे काम सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे. आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे. हे अभियान शंभर दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवायचे असेल, तर या सरपंचांबरोबर, ग्रामसेवकांबरोबर अधिकारीदेखील असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी हा असा एकमेव जिल्हा आहे, की जिथे डीपीसीच्या फंडातून घनकचऱ्याच्या गाड्या दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये होणारा कचरा चांगल्या पद्धतीने जमा केला पाहिजे. त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. स्वच्छ वातावरणामध्ये गाव ठेवला पाहिजे. कोण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे, कोण जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, ते सगळे लोक लक्षात ठेवतात आणि अशा अभियानाच्या माध्यमातून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य घराघरात पोहोचले, तर तुमचेदेखील राजकीय अस्तित्व राहणार आहे. सगळ्या परंपरा आणि संस्कार असणारा रत्नागिरी जिल्हा परीक्षेमध्ये पुढे असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेतला पट कमी का होतोय, हादेखील विचार शंभर दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी करायला हवा. दामले विद्यालय पहिलीमध्ये १६० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकते, तर ग्रामीण भागातील शाळा ६० विद्यार्थ्यांना का देऊ शकत नाही, याचे आत्मचिंतन आपण केले पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये ९९.९९ टक्के शिक्षक चांगले असल्यामुळेच कोकण बोर्डामध्ये आपला एक नंबर येतो. त्याच्यामध्ये शिक्षकांना कुठेही कमी लेखण्याचे काम नाही,’ असेही पालकमंत्री म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version