आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील शिलालेखाचे नीतेश राणेंच्या हस्ते गणेशगुळ्यात अनावरण

गणेशगुळे/रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आज (९ नोव्हेंबर) मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रसेविका समिती आणि रत्नागिरीतील रेणुका प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महिला सक्षमीकरण म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून, राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचे हे मोठे काम आहे,’ असे उद्गार या वेळी नीतेश राणे यांनी काढले.

या वेळी गणेशगुळ्याच्या माजी सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. पद्मजा अभ्यंकर, रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. दीपा पाटकर, जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका सौ. मीरा भिडे आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. उमा दांडेकर या वेळी उपस्थित होत्या. समिती शाखेच्या वतीने ध्वजारोहण, घोषवादन, प्रार्थना, ध्वजावतरण, शिवस्तुती पठण, सेविकांची विविध प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम झाले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

या वेळी बोलताना राणे म्हणाले, ‘अतिशय शिस्तबद्ध असलेल्या हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता. या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल. त्याशिवाय समितीचे अनेक उपक्रम चांगले आहेत. कोकणात स्त्रीशक्ती प्रबळ असताना ती भक्कम करण्याचे मोठे काम राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला, माता-भगिनींचे योगदान मोठे आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात एकूण लोकसंख्येमध्ये ६२ टक्के महिला आहेत. त्यांना सक्षम करणे आणि त्यातून कोकणाचा विकास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अलौकिक इतिहासाचे स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणे म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे.’

‘लव्ह जिहाद या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नावर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मुलींची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, त्यांना शारीरिक आणि मानसिक सक्षम करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आणि त्याच वेळी आज राष्ट्रसेविका समिती करत असलेल्या कामाचे महत्त्व वाढते. आज हिंदू समाज म्हणून एकत्र येण्याची गरज आहे हे ओळखणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीची गरज आहे, आजूबाजूला असलेल्या कटू वास्तवाला सामोरे गेले पाहिजे,’ असे राणे म्हणाले.

आज समिती जे काम करत आहे त्याला आपले नक्कीच सहकार्य असेल, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहकार्य करेन अशी ग्वाही राणे यांनी या वेळी दिली. भविष्यात कोकण किनारपट्टीवर हिंदू समाजाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगताना राष्ट्रसेविका समितीच्या राष्ट्रनिर्माण कार्यात सदैव सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमातील प्रमुख वक्त्या पद्मजा अभ्यंकर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती देतानाच, त्या म्हणाल्या, की ‘शिक्षण आणि ध्येयपूर्ती या जगण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी असून त्यातूनच राष्ट्र आणि धर्माचा विचार केला पाहिजे, यासाठी कुटुंबातील संवाद वाढवणे आणि त्यात देश व समाजाच्या ऋणांविषयी बोलणे गरजेचे आहे.’

उमाताई दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. मीरा भिडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते अनेकांचा सन्मान करण्यात आला. कुर्धे शाळेतील विद्यार्थिनींची डंबेल्स प्रात्यक्षिके, जिजामाता शाखेतील सेविकांची लेझीमची प्रात्यक्षिके, दंडांची प्रात्यक्षिके, घोषवादन, गणेशगुळे शाळेतील विद्यार्थ्यांची देशभक्तिपर गीते आदी सादरीकरणे झाली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply