लेखकपत्नीची जन्मशताब्दी साजरी होणं दुर्मीळ : मंगला गोडबोले

रत्नागिरी : ‘मराठी साहित्याच्या दृष्टीने पाहिलं, तर ‘आहे मनोहर तरी’पूर्वीचं महिलांचं आत्मपर लेखन आणि त्यानंतरचं लेखन यात फरक आहे. ‘आहे मनोहर तरी’चं अपूर्व असं स्वागत आजपर्यंत महाराष्ट्राने केलं आहे. लेखन, अभिनय, नृत्य आदी कला स्वतःकडे असूनही, सुनीताबाई आयुष्यभर वावरल्या त्या पु. ल. देशपांडे यांच्या गृहिणी-सखी-सचिव म्हणूनच. ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातून सुनीताबाईंनी जी एक धिटाई दाखवली आणि दिली, त्यानंतर पुष्कळ लेखक आणि कलावंतांच्या पत्नींची अशी आत्मपर लेखनं प्रसिद्ध झाली. साधनशुचिता आणि कलेवरची अंतिम निष्ठा या दोन मूल्यांच्या साह्याने त्यांनी अतिशय निरलसपणे गृहिणीपण आणि सचिवपण पार पाडलं,’ असं निरीक्षण प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नोंदवलं. ‘पु. ल. देशपांडे नावाचा एक बहुढंगी कलाकार त्यांनी महाराष्ट्राला मुक्तपणे मिळू दिला. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर लागतील ते कष्ट घेण्याची आणि वाईटपणा घेण्याची सदैव तयारी ठेवली. निर्मिक हा कलाक्षेत्राचा आधार असून, त्यांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं सांगत त्यांनी लेखक, कलावंतांच्या स्वामित्वहक्कांसाठी महत्त्वपूर्ण लढा दिला. किती तरी लेखकांची जन्मशताब्दी होते; मात्र लेखकपत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग दुर्मीळ आहे,’ असे गौरवोद्गार गोडबोले यांनी काढले. सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या माहेरी अर्थात रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी (नऊ नोव्हेंबर) त्या बोलत होत्या. राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने आर्ट सर्कल या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी ‘सुनीताबाई-पु. ल.’ सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या ‘सांजसोबत’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. माधुरी पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, कौशल इनामदार, वैभव जोशी अशा नामवंत कलावंतांचे वैविध्यपूर्ण कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. (भाषणांचे व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

मंगला गोडबोले यांनी सुनीताबाईंच्या जीवनाच्या विविध पैलूंचा आणि या दाम्पत्याच्या सहजीवनाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण मांडलं. ‘मला उमजलेल्या सुनीताबाई मी मांडत आहे,’ असं सांगून त्या म्हणाल्या, ‘सुनीताबाईंनी नेहमीच स्वतःच्या अटींवर जगणं पसंत केलं. पु. ल. आणि सुनीताबाई यांचं सहजीवन म्हणजे दोन अतिशय विसंगत माणसांचं सहजीवन होतं. त्यांनी कधीही मी लेखिका आहे, अभिनेत्री आहे असं म्हटलं नाही. सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’चं पु. ल. देशपांडे यांनीही कौतुकाने स्वागत केलं आहे. पु. ल. देशपांडे म्हणाले होते, की ‘सुनीताने माझं देवत्वाचं कवच काढलं, ते फार बरं झालं. एखाद्याला देव केलं, की त्याला आयुष्यभर तसं राहण्याची आणि माणूस न राहण्याची सक्ती होते. माझ्यावरची ती सक्ती काढली ते बरं झालं.’ सुनीताबाईंनी पु. ल. देशपांडे नावाचा एक बहुढंगी कलाकार महाराष्ट्राला मुक्तपणे मिळू दिला. त्यासाठी लागेल ते कष्ट आयुष्यभर घेण्याची आणि वाईटपणा घेण्याची तयारी सदैव ठेवली. हे सर्वांत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांच्याबद्दल ऋणी राहिलं पाहिजे. कलेचा निर्माता हा संपूर्ण कलाक्षेत्राचा आधार आहे. त्याचा शब्द अंतिम आहे आणि त्याची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे सुनीताबाईंनी पहिल्यांदा सांगितलं आणि अखेरपर्यंत सांगत राहिल्या. त्यांच्यामुळे अनेक लेखकपत्नींना पैसे मिळाले. सुनीताबाईंनी तत्त्वाबद्दल ठाम राहून वाईटपणा घेतला. किती तरी लेखकांची जन्मशताब्दी होते; मात्र लेखकपत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग दुर्मीळ आहे.’ (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी ‘आहे मनोहर तरी… बरंच काही’ या विषयावर मनोगत व्यक्त केलं. ‘सुनीताबाईंचा मनोपिंड तत्त्वज्ञानाचा, प्रत्येक गोष्टीकडे गंभीरपणे बघण्याचा होता, तर पुलंचा मनोपिंड जीवनाचा रसिकपणे आस्वाद घेण्याचा होता. एक लेखिका म्हणून, एक तत्त्वचिंतक म्हणून ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातून सुनीताबाई कशा दिसतात हे दाखवण्याचा फारसा प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही. त्याची तात्त्विक समीक्षा करण्याचे प्रयत्न या जन्मशताब्दी वर्षात तरी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांकडून व्हायला हवेत,’ अशी अपेक्षा बांदेकर यांनी व्यक्त केली. ‘आहे मनोहर तरी’ हे मराठीतलं वेगळं आत्मचरित्र आहे. भाषाशैली, रचनाबंध, आशयसूत्र असे त्याचे सगळेच पैलू वेगळे आहेत. पुरुष समजून घेण्याकरिता स्त्रियांनी आणि खासकरून पुरुषांनी ते वाचण्याची गरज आहे. या अर्थाने या पुस्तकाचं महत्त्व आहे, असंही बांदेकर यांनी नमूद केलं.

पु. ल.-सुनीताबाईंचे पुतणे जयंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी दीपा देशपांडे यांनी या दाम्पत्याच्या काही हृद्य आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी प्रास्ताविक, तर दीप्ती कानविंदे यांनी निवेदन-सूत्रसंचालन केलं. काव्यवाचन, अभिवाचन, त्याच्या स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, सामाजिक संस्थेला पुरस्कार असे विविध कार्यक्रम यात राबवण्यात आले. एकंदरीतच, हा उपक्रम सुनीताबाई आणि पुलंच्या पैलूंची चर्चा करणारा, स्मृती जागवणारा आणि त्या निमित्ताने साहित्य चळवळीला नवी प्रेरणा देणारा ठरला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply