चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
दि. ११-११-२०२५
नाटक : अकल्पित
संस्था : दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत, गुहागर
लेखक – हरीश सामंत
दिग्दर्शक – संदीप वणकर
श्रेयनामावली
रंगभूषा : श्रीकांत वायंगणकर
प्रकाशयोजना : प्रशांत घवाळी
पार्श्वसंगीत : योगेश मांडवकर
नेपथ्य : दिलीप धामणे
पात्र परिचय
आकाश : राकेश भोसले
बंडोपंत : अमोल वायंगणकर
नताशा : इषिता वणकर
शास्त्री : गणराज धोपावकर
पप्पा : विघ्नेश वणकर
शुभम : आशिष दाभोळकर
इन्स्पेक्टर : सुमित वणकर
हवालदार : उपेंद्र दाभोळकर
भविष्यावर ठेवलेला विश्वास आणि योगायोग
भविष्यावर विश्वास ठेवणारे आणि विश्वास न ठेवणारे लोक समाजात असतात. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असतात. त्यावर भाष्य करणारे आणि प्रेमासाठी त्याग करून निराधारांना आधार देण्याचे ध्येय बागळणाऱ्या कुटुंबाचे चित्रण अकल्पित नाटकात घडविण्यात आले आहे.
एका प्राप्तिकर अधिकारी पप्पा यांना भविष्य बघण्याचा छंद असतो. प्रत्येक गोष्ट शास्त्रींना विचारल्याशिवाय ते करत नसतात. मुलगी नताशा कॉलेजला तर मुलगा शुभम डॉक्टर असतो. नताशाचे कॉलेजमधील मित्र आकाश याच्यावर प्रेम असते. एकेदिवशी शास्त्री प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे राहण्यासाठी आकाशला पाठवतात. बंगल्यात आल्यावर आकाश आणि नताशामध्ये पुन्हा प्रेमाचा अंकूर फुलतो. नताशा आकाशला घरची हकीगत सांगते. मला आई नाही. निराधारगृहात काम करताना तापसरी येते आणि त्यात तेथील मुलांसह आईचाही अंत होतो. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लग्न केल्यानंतर स्वतःला मूल न होऊ देता एखादे मूल दत्तक घेऊन त्याचा संभाळ करणार असल्याचे नताशा आकाशला सांगते. आकाशही तिच्या प्रेमासाठी दत्तक मुलाला वाढवून संसार करण्याचे स्वप्न पाहू लागतो.
इकडे नताशाचे वडील पप्पा आकाशकडून त्याची पत्रिका घेतात व शास्त्रींना दोघांची पत्रिका बघण्यास सांगतात. ते नताशाला आकाशकडून मूल होणार नाही, संसारसुख मिळणार नाही असे सांगतात. त्यामुळे ते तिच्या लग्नाला नकार देतात. ते तिच्यासाठी दुसरा मुलगा बघतात. नताशा मात्र त्या विवाहाला नकार देते. त्यामुळे पप्पांना हृदयविकाराचा झटका येतो. दरम्यान, मुंबईत गेलेला आकाश परत घरी येतो. नताशा वस्तुस्थिती त्याला कथन करते. आपले प्रेम इथेच संपले, असे सांगते. तिचे वडील बरे होऊन येतात. त्यांचा डॉक्टर मुलगा शुभमही घरी येतो. तो आकाशला पाहतो आणि वडिलांना त्याची हकीगत सांगतो. आकाश हा एक मवाली आहे. प्रकाश देशपांडे या नावाने तो वावरत आहे. त्याचे लग्न झाले आहे. उच्चभ्रू घराण्यातील मुलींना फसवण्याचा त्याचा धंदा आहे, असे सांगून आकाशला तो पोलिसांच्या ताब्यात देतो. आकाशही आपली चूक झाली, असे म्हणून त्यांच्या स्वाधीन होतो. इकडे शास्त्री त्याला जामिनावर सोडवतात आणि नंतर पप्पांच्या घरी येतात. त्या वेळी नताशा तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी व प्रेमासाठी आकाशने स्वतः कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे सांगते. तीच शस्त्रक्रिया तिच्या भावाने केलेली असते. मात्र आकाशने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रकाश देशपांडे हे नाव धारण केलेले असते. आपले लग्न झाले आहे, आपल्याला मुले आहेत, हेही त्याने खोटेच सांगितलेले असते. डॉ. शुभमला ते खरेच वाटते आणि पुढचा सारा प्रसंग घडतो. आकाशने प्रेमासाठी केलेला त्याग दिसतो आणि भविष्यवाणीही खरी होते. आकाश आणि नताशा यांचे प्रेम सुकर होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




