रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या आणि छाननीनंतर वैध ठरलेल्या एकूण ९१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यात नगराध्यक्षपदांच्या सात, तर नगरसेवकपदांच्या ८४ उमेदवारांचा समावेश आहे. अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची (२१ नोव्हेंबर) मुदत समाप्त झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त वैभव गारवे यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी आणि राजापूरच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतलेला नाही. चिपळूण नगर परिषद, तसंच लांजा आणि गुहागर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. खेड नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या प्रत्येकी दोघा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतून रत्नागिरीतल्या १९, चिपळूणमधल्या ११, खेडमधल्या १७, तर राजापुरातल्या आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीतून नगरसेवकपदासाठी उभ्या राहिलेल्या ११, देवरूखच्या आठ, तर गुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीतून १० उमेदवारांनी माघार घेतली आहे.

दरम्यान, रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कीर यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उबाठाने तीन ठिकाणी काँग्रेसविरुद्ध उमेदवार उभे केले असून, आजची मुदत संपेपर्यंतही त्यांनी अर्ज मागे घेतले नसल्याने हा निर्णय घेतल्याचे कीर यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply