चिपळूण : चिपळूण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती अभिनव गणपत वाणी राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातील ५३६ कवींनी प्रतिसाद दिला.
स्पर्धेसाठी कवींना बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील “गणपत वाणी बिडी पिताना” ही पहिली ओळ देण्यात आली होती. अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने कवींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता होती. तिचे प्रतिबिंब स्पर्धेतील कवींच्या सहभाग-प्रतिसादात उमटलेले दिसले. या स्पर्धेत जगातील इंग्लंड, इस्रायल आदी देशांत वास्तव्याला असलेल्या मराठी कवींनी सहभाग घेतला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगण राज्यांसह महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, अहिल्यानगर, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, ठाणे, धाराशिव, धुळे, नवी मुंबई, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, भंडारा, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यातील कवींनी स्पर्धेत सहभाग घेतला. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात चिपळूण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या जिल्हा युवा संमेलनांतर्गत एका विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
एखाद्या सर्वज्ञात कवीच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यःस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाजवास्तवाला भिडणे असे अभिनव स्वरूप असलेल्या या स्पर्धेला पहिल्या प्रयत्नात अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी जगभरातील सर्व सहभागी मराठी भाषिक कवींना धन्यवाद दिले आहेत.
स्पर्धेचा निकाल आणि विजेत्यांच्या गौरव निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन जानेवारी-फेब्रुवारी २०२६मध्ये विशेष कार्यक्रमात केला जाणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

