Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कर्ण : कर्णाच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेने कर्ण हे महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित नाटक सादर केले.

महाभारत हे भारतीय महाकाव्य म्हणजे अनेक कथांचा खजिना आहे. त्यातील कर्ण या महत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवनातील विविध प्रसंग उलगडण्याचा प्रयत्न कर्ण या नृत्यनाट्यातून बारामतीच्या नटराज नाट्य कला मंडळाने केला. हिंदीतील मूळ लेखक कुलविंदर बक्शिश सिंह यांच्या लेखनाचा मराठी नाट्यानुवाद जयश्री देसले यांनी केला आहे. त्या नाट्यसंहितेला कल्पिता राणे व विनीता जोशी यांनी दिग्दर्शित करून नृत्यनाट्य साकारले आहे.

पडदा उघडताच कथ्थकचे बोल ऐकू येतात आणि रंगमंचावर ‘कर्ण’ रथाचे चाक हातात घेऊन बसला आहे, क्षणार्धात ते चाक तो फेकून देतो आहे. उत्तम प्रकाशयोजनेद्वारे हा पहिलाच प्रसंग परिणामकारक झाला आहे. त्यानंतर लगेच अंधार होऊन कर्णाच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग रंगमंचावर एकामागोमाग एक सादर होतात.

चंपानगरीमध्ये अधिरथ व राधामाता यांना कुंतीने गंगा नदीत सोडलेले बाळ मिळते. त्यानंतर कर्णाचा लहान बंधू ‘शोण’ याच्यासोबतचे बालपण, दुर्योधनाची भेट, गुरू द्रोणाचार्यांना त्यांच्या आश्रमात येऊन युद्धकला शिकवण्याची कर्णाने केलेली विनंती, द्रोणाचार्यांचा नकार, पितामह भीष्मांची भेट, सूर्यदेवांना साक्षी ठेवून धनुर्विद्या, युद्धकला शिकण्याचा सराव, गुरुकुलातील शिष्यांच्या युद्धकला प्रदर्शनात सूतपुत्र म्हणून झालेला अपमान, दुर्योधनाकडून मिळालेला मैत्रीचा हात, अंगदेशाचे राजेपद, देवराज इंद्राकडून कवचकुंडलांची मागणी, परशुरामांकडून मिळालेली धनुर्विद्या, मात्र त्याच वेळी मिळालेला शाप, श्रीकृष्णांची एकांतात भेट व त्यांच्याकडून जन्माच्या रहस्याची उकल, कुंतीमातेची भेट, तिच्या पाच पुत्रांबद्दलचे अभय, निर्णायक युद्ध आणि मृत्यू या कर्णाच्या आयुष्यातील ठळक घटना थोडक्या संवादातून सांगण्यात आल्या. नृत्याविष्कारातून लय, देह व मिथक यांच्या साहाय्याने त्या सादर करण्यात आल्या.

दुसऱ्या अंकातील कृष्ण व कर्णाची भेट व कुंती व कर्णाची भेट या दोन प्रसंगांमधील एकमेकांतील संवाद दर्जेदार होते. कलाकारांनी त्याला योग्य न्याय दिल्याने ते परिणामकारक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे झाले.

या नृत्यनाट्यात मणिपुरी मार्शल आर्ट, कलरीपयडू, थांग-ता, मांड/मजात्रा, लामजाओ, लाई हराओबा व भारूड या विविध प्रकारच्या भारतीय नृत्यप्रकारांचा, लोककलांचा व युद्धकलांचा वापर संवाद, देहभाषा, देहबोलींद्वारे करण्यात आला असून त्याला योग्य, साजेशी परिणामकारक प्रकाशयोजना वापरली असल्याने प्रसंगांचे सौंदर्यही खूप वाढताना दिसते.

महापराक्रमी असूनही अन्याय्य, असत्याची बाजू घेतल्याने कर्णाच्या आयुष्याची शोकांतिका झाली. हेच या नाटकाचे कथानक अधोरेखित करते.

तीनच स्त्री कलाकारांनी रंगमंचावरच वेश बदलून (ओढणी, दुपट्टा, शाल, उपरणे यांचा वापर करून) यातील भूमिका वठवल्या आहेत.

श्रेयनामावली
नटराज नाट्य कला मंडळ, बारामती
नाटक – कर्ण
मूळ लेखन : कुलविंदर बक्शिश सिंह
मराठी अनुवाद : जयश्री देसले
दिग्दर्शक : कल्पिता राणे, विनीता जोशी
निर्माता : अभिषेक नारायण
प्रकाशयोजना : चेतन ढवळे
संगीत : भूषण भावसार
नेपथ्य : गौरव सावंत
रंगभूषा – वेशभूषा : प्रतिभा शेंडे ढवळे
रंगमंच व्यवस्था : लिखित, मुमताज अली, अपूर्वा पंडित, पूजा पटेल
नेपथ्य निर्माण : सुजित, विक्रांत राजपूत, आंचल कुमारी

पात्रपरिचय
सूत्रधार, कर्ण – सायली कुबडे
सूत्रधार, शोण, अर्जुन, दुर्योधन, वृक्षवर्मा – प्रतीक्षा ठाकूर
सूत्रधार, राधामाता, शोण, मित्र, अधिरथ, द्रोण, भीष्म, वृषाली, इंद्र, परशुराम, कुंती, श्रीकृष्ण – कल्पिता राणे

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version