छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.