उषा परब यांच्या मालवणी साहित्यात विविधता : गोव्यातील परिसंवादातील मत

पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.

ताळगाव (गोवा) येथील साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे पणजीतील साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ साहित्यिक उषा प्रकाश परब यांच्या समग्र साहित्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. उषा परब यांनी आपल्या साहित्यात विविधता जोपासली आहे, असे मत विविध वक्त्यांनी परिसंवादात व्यक्त केले. साखळी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. स्नेहा सुवास प्रभुमहांबरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.

बालसाहित्याची सर्व वैशिष्ट्ये उषा परब यांच्या साहित्यात दिसतात. प्रौढांनी लिहिलेले सफाईदार बालसाहित्य या प्रकारात त्यांचे लेखन मोडते, असे प्रा. पौर्णिमा केरकर यांनी सांगितले.

कालिका बापट यांनी परब यांच्या कवितासंग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये सांगून काही कविता पेश केल्या.

अचिंत अध्याय या कादंबरीत आईविना असलेल्या पिल्लाला आई शोधण्यासाठी लेखिकेबरोबर त्यांच्या मुलाने केलेल्या पायपिटीची माहिती असल्याचे प्रतिपादन अंजली आमोणकर यांनी केले.

फुलेल बाग पुन्हा आणि फुलपाखरू एक कीटक आहे या बालएकांकिकांमधील भाषा मुलांच्या मनोगते बोलावे या उक्तीप्रमाणे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा बालसाहित्यात यायला हवी, असे मत साहित्यिक पत्रकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात माहेर असलेल्या उषा परब यांच्या कुसवा या कादंबरीची समीक्षकांनी चांगली दखल घेतली आहे. त्यांच्या या कादंबरीतील पात्रे आपल्याभोवती पिंगा घालतात. वैशिष्ट्यपूर्ण वर्णने आणि बोलीभाषेचा वापर, त्या त्या पात्रांचे स्वभाव उषा परब यांनी कुसवा या कादंबरीत वर्णन केल्याचे प्रतिपादन पत्रकार परेश प्रभू यांनी व्यक्त केले. या परिसराचे आणि व्यक्तिविषयांचे बारकावे त्यांनी टिपले आहेत.

या चर्चासत्राला साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा प्रकाश क्षीरसागर याही व्यासपीठावर होत्या.

बहारदार कविसंमेलन
यानंतर झालेल्या कविसंमेलनात लक्ष्मण पित्रे, नजराना दरवेश, प्राची नाईक, गौस अन्सारी, प्रमोद कारापूरकर, गौरी भालचंद्र, अंजली चितळे, नूतन दाभोळकर, विनोद नाईक, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, अलिशा गडेकर, बबिता गावस, सुनेत्रा कळंगुटकर, पौर्णिमा केरकर आणि उषा परब यांनी भाग घेतला. शुभदा च्यारी हिने सूत्रसंचालन केले.

साहित्यलेणी प्रतिष्ठान ही ताळगाव (गोवा) येथील संस्था असून या संस्थेमार्फत कविसंमेलने, विविध साहित्यावर चर्चासत्रे व परिसंवाद घेण्यात येतात. लिहिणाऱ्या हातांचा उत्सव हा कार्यक्रम तसेच कर्तृत्ववान महिलांचा प्रवास या उपक्रमाअंतर्गत सहा महिलांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply