ब्रिटनमध्ये असलेली शिवरायांची जगदंब तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला परत मिळणार; ब्रिटिश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अ‍ॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या चर्चेवेळी ब्रिटिश उच्चायुक्तालयातील राजकीय विभाग विषयक उपप्रमुख श्रीमती इमोजेन स्टोनदेखील उपस्थित होत्या.

ब्रिटनकडून जगदंब तलवार व वाघनखे शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य सरकार राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रस्तावित बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रिया ठरविण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाचा ३५०वा वर्षपूर्ती महोत्सव सुरू असतानाच जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणली जातील, अशी शक्यता आहे.

या बैठकीला महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ब्रिटन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचे २५ विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे २५ विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदान-प्रदानासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि ब्रिटिश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक संवादातून दोन्ही संस्कृतींना एक नवी उंची प्राप्त होईल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply