रत्नागिरी : ‘गेल्या दोन महिन्यांत कोकणात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्वॅबच्या तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाच्या बाबतीत सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे हे लक्षण आहे. समन्वयाच्या अभावामुळे राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,’ अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (२० मे) रत्नागिरीत केली.
दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांचे पथक कोकणाच्या दौऱ्यावर आले आहे. आज (२० मे) रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी राज्य शासनावर टीका केली. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष राज्यातील जनतेसोबत आहे. त्यामुळेच राज्यात समाधानकारक स्थिती नसताना आम्ही जनतेसाठी उपाययोजना करत असून आवश्यक तेथे निधी देत आहोत. कोकणात स्वॅबची तपासणी आणि करोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून हे सर्व उपचार मोफत व्हावेत, अशी मागणी केली आहे.’
‘डेरवण येथील मेडिकल कॉलेजमध्ये स्वॅब तपासणी सुरू करण्यासाठी आठ दिवसांत प्रयत्न केले जातील,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे दरेकर यांनी सांगितले.
‘मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत कोठेही शासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याचे दिसत आहे,’ असे सांगून दरेकर म्हणाले, ‘शिवसेनेने मच्छीमार, आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांना वाऱ्यावर सोडले आहे. कोकणातील उद्योगांना कोणतेही पाठबळ दिले नाही. आता लवकरच मोसमी पाऊस सुरू होणार आहे. त्यापूर्वी बांधावर बी-बियाणे देऊ, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. हे बियाणे बांधावर आणि मोफत लवकरात लवकर मिळायला हवे. व्यावसायिक, मध्यम आणि लघु उद्योजकांना आधाराची गरज आहे. केंद्रातील मोदी सरकारने वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात मच्छीमारांचा समावेश आहे. राज्य सरकारने मात्र कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. ते आता स्वतंत्रपणे घोषित करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोफत एसटीची घोषणा केली, पण ती हवेतच विरली.’
‘आपले अपयश झाकण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आणि कोकणातील नागरिक यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न शासनातर्फे केला जात आहे,’ अशी टीकाही दरेकर यांनी केली. ‘मुंबईतील चाकरमान्यांचे कोकणात स्वागतच व्हायला हवे. कारण ते याच भूमीचे पुत्र आहेत; पण त्यांच्यापासून करोनाचा प्रादुर्भाव शंभर टक्के होणार नाही, याची हमी दिली पाहिजे. तपासणी करूनच भूमिपुत्रांना कोकणात जाऊ दिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावाला जाऊ नका, असे आवाहन मुंबईतील चाकरमान्यांना केले आहे. कारण कोकणात तपासणीची यंत्रणा नाही. अशा स्थितीत कोकणी माणूस आणि मुंबईकरांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे. वाद होऊ नयेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना केली आहे,’ असे दरेकर यांनी सांगितले.
‘ज्या शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले त्या कोकणात शिवसेनेचे मंत्री फिरत नाहीत. रत्नागिरीचे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरी फिरत आहेत. ही शिवसेनेकडून होणारी कोकणातील लोकांची प्रतारणाच आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच घेतलेल्या काही पत्रकार परिषदांचा संदर्भ देऊन दरेकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘करोनामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थी अभ्यासाला लागले. त्यानंतर उदय सामंत यांनी ‘यूजीसी’कडे तृतीय वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे आणि तशी मागणी केली आहे. मंत्र्याला मागणी करावी लागते, हेच आश्चर्यकारक आहे.’
माजी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘करोनावावर आतापर्यंत उपाय सापडलेला नाही. त्यामुळे तपासणी आवश्यक आहे. रत्नागिरीत स्वॅब तपासणीची यंत्रणा नाही. त्यासाठी आजपर्यंत प्रशासनाने कोणताही अर्ज केलेला नाही. हे सत्ताधाऱ्यांचे आणि प्रशासनाचे अपयश आहे. अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करताहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३५ हजार लोक होम क्वारंटाइन असून, सुमारे ३५० बेडची व्यवस्था जिल्ह्यात आहे. खासगी रुग्णालयातील बेड घेतले जाणार आहेत; पण दुर्दैवाने करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, तर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज नाही.’
पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे कोकण प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार भाई गिरकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवी पाटील, आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
(पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)