रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ४) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नव्या १३ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६९६ झाली आहे. राजापूर शहरात पहिला रुग्ण सापडला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या २४ तासांत १३ रुग्णांची वाढ झाल्याने, तेथील रुग्णांची एकूण संख्या २४२ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
काल (तीन जुलै) सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार १३ नव्या करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे विवरण असे – चिपळूण येथील तीन रुग्ण कामथे उपजिल्हा रुग्णालयात, राजापूर येथील एक, रत्नागिरीतील दोन आणि लांज्यातील एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल, खेड येथील पाच जण कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात, तर दापोलीतील एक रुग्ण दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०९ असून, त्यापैकी चार रुग्णांवर रुग्णालयाच्या बाहेर उपचार चालू आहेत.
जिल्ह्यात सध्या ४९ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १९, दापोलीत ६, खेडमध्ये ३, लांजा तालुक्यात ५, चिपळूणमध्ये १२, मंडणगड तालुक्यात एक आणि राजापूर तालुक्यात तीन गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ६१ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, २४, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – १०, ग्रामीण रुग्णालय गुहागर- १, केकेव्ही, दापोली – २४. मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या घटली असून, ती आता १६ हजार ५१७ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत १० हजार २९७ नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी १० हजार १६३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ६९६ अहवाल पॉझिटिव्ह, तर नऊ हजार ४५३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी १३४ नमुन्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहे.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून करोनापासून सुरक्षित असलेल्या राजापूर शहरात करोनाने प्रवेश केला आहे. शहरातील साखळकरवाडी येथे पहिला करोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या महिला करोना रुग्णाच्या संपर्कात एकूण ५२ जण आले असून, त्यातील २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.
जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले तीन महिने राजापूर शहर करोनामुक्त होते. मात्र आता करोनाचा पहिला रुग्ण आता सापडला आहे. साखळकरवाडीतील ४२ वर्षीय महिलेचा वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्या महिलेला लगेचच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या एकूण ५२ जणांपैकी जोखमीच्या २३ जणांचे स्वॅब घेऊन त्यांना रायपाटण येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतर २९ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉ . मेस्त्री यांनी दिली.
राजापूर शहरातील ज्या साखळकरवाडी भागात ही करोनाबाधित महिला सापडली आहे तो भाग कंटेन्मेंट झोन करून सील करण्यात आला आहे. राजापूर शहरातील रॉयल रेसिडन्सी, चौगुले रेसिडेन्सी, डीएमएस हॉस्पिटल, माउली हॉस्पिटल, आयसीआयसीआय बॅंक आदी ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (तीन जुलै) रात्री उशिरा सात, तर आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची एकूण संख्या २४२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, १६६ जणांनी करोनावर मात केली आहे.
……
