एका राजूची गोष्ट
एक आहे राजू.
राजू वर्षानुवर्षे त्याच शिक्षणपद्धतीचा अनुनय करत आला आहे. तीच समज, त्याच कल्पना, तीच ती क्रमिक पुस्तके, अन् शिकवण्याची/ शिकण्याची पद्धत. राजू शाळेत जातोय, मार्क्स घेतोय, रिपोर्ट कार्ड पाहून खूश होतोय किंवा निराश होतोय. डिग्री अन् सर्टिफिकेटची बिरुदे नावासमोर जोडून राजू आपले शिक्षण पूर्ण करतोय.
राजू शिक्षण क्षेत्रात जातो, शिक्षक बनतो. तेच ते स्वाध्याय, पाठ वर्गावर घेत राहतो. राजूला मुलांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. राजू धडा वाचतो, पुस्तक बंद करतो अन् वर्गातून बाहेर येतो. काही मुले पुस्तकी अभ्यासात जास्त हुशार असतात, काहींच्या अंगी एखादी कला असते; पण कला पोटापाण्याचा प्रश्न सोडवत नाही, म्हणून राजू तिथे दुर्लक्ष करतो. राजू पालक-शिक्षक सभेत बचावाचा पवित्रा घेतो. कारण त्याला मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या पोटावर पाय येऊ देणे परवडणारे नाही.
कधी तरी राजू तिथला पालक असतो. त्याला आपल्या मुलाचे प्रश्न कळत आहेत, काही तरी चुकतेय, हे कळत आहे; पण त्याच्याकडे उपाय नाही. राजू समाजातला एक घटक आहे, जो वर्षानुवर्षे ही पद्धत स्वीकारत आला आहे; पण त्याला त्यात बदल कसा करायचा हे समजत नाहीये. सरकारी शाळा, शाळेतली व्यवस्था, एकंदरीत परीक्षा पद्धती, मुलांची संवेदनशीलता, भावनांक या अन् अश्या अनेक प्रश्नांकडे राजूला बदलाचे तारू वळवायचे आहे; पण त्याच्या हाती सुकाणू नाही.
राजूला बदल करायचे आहेत. त्याच्यासमोर प्रश्न आहेत.
कधी तरी यावर परिसंवाद होतात, चर्चासत्रे झडतात, मीटिंग घेतल्या जातात. परिषद घेतली जाते. एखाद्या प्रश्नाचा त्याच त्या पद्धतीने उत्तरे शोधून, त्याचा शास्त्रीय संशोधनात्मक भाषेत किस पाडला जातो. एखादा बदल सुचवला जातो; पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी त्याला हजारो अग्निदिव्यांतून जावे लागते. तोपर्यंत इच्छाशक्ती मरते, बदल तर कुठच्या कुठे विरून जातो.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या या पद्धतीत बदल करावासा कुणालाच वाटला नाही. समाजातील अनेक राजूंना या प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक बदल सुचवावेसे वाटले; पण ते जाहीरपणे मांडायचे कसे? ही मंडळी काही तज्ज्ञ नव्हती; पण त्यांच्याकडे आवश्यक ती तळमळ होती. कोणत्या तरी प्रश्नावर आपल्याला उपाय शोधायचा आहे, ही इच्छा होती. भलेही त्यांच्यासमोर उद्दिष्ट स्पष्ट नव्हते; पण आपण काही तरी बदल करू शकतो हे त्यांना आजमावून पाहायचे होते.
पण वर्षानुवर्षे ह्या सगळ्या त्रुटी डोळ्याआड करून, वरवर उत्तमतेची झापडे लावून आपली शिक्षण पद्धती अशीच चालू राहिली.
कोरोना अन् शिक्षण
अन् मग एक वर्ष आले, ते येताना एका विषाणूला बरोबर घेऊन आले. पाहता पाहता या विषाणूचा प्रसार वाढत गेला, अन् त्याबरोबर सुरू झाली टिकण्याची अन् टिकवण्याची धडपड. लॉकडाउन अन् सामाजिक अंतर पाळताना आत्यंतिक काळजी म्हणून दळणवळण ठप्प झाले. प्रत्यक्ष संपर्क टाळावा लागला. खूप नुकसान झाले. सर्व क्षेत्रांत या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव दिसून आला.
अन् यात सर्वांत मोठी हानी झाली, ती शिक्षणक्षेत्राची.
संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद झाल्या. घरी बसून मुलांची होणारी तथाकथित शैक्षणिक हानी टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग चोखाळण्यात आला; पण मुळात हे सारे नवीन होते, अन् अचानक येऊन उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिक्षक व विद्यार्थी, दोघेही या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ होते. कमी संसाधने, तंत्रज्ञानाबाबत बाळगलेली अनास्था, नेटवर्क व इंटरनेटचा अभाव यामुळे होणारी दुरवस्था विकोपाला गेली. एकूणच सगळा खेळखंडोबा होऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.
अन् मग इथेच आपल्या या शिक्षण पद्धतीचे आधी डोळ्याआड केलेले दोष ठळकपणे डोळ्यात भरण्यास सुरुवात झाली.
कारण मूलभूत प्रश्नांवर सुनियोजित उपायांची पूर्वीपासूनच वानवा होती. वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत सर्व घटकांना निर्णप्रक्रियेत स्थान नव्हते. इथले निर्णय घेणे, अन् धोरणे ठरवणे ही फक्त काही कागदी घोडे नाचवणाऱ्या असामींची मक्तेदारी बनून राहिली होती. ज्यांच्यासाठी बदल करायचा, त्यांना आपले मत मांडायची संधीच मिळत नव्हती.
हे कुठे तरी थांबवायचे तर अगदी मूलभूत पातळीवर काही ठोस पावले उचलणे गरजेचे होते.
मेकशिफ्ट अन् एक अनोखा प्रवास
इथे कहाणी सुरू झाली एका वेगळ्या प्रवासाची. या गोष्टीतल्या राजकन्या आहेत रुचिरा सावंत अन् शर्वरी कुलकर्णी या दोन धडपड्या मुली. या दोघी गेल्या अनेक वर्षांपासून नावीन्यपूर्ण शिक्षण (इनोव्हेशन इन एज्युकेशन) या क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये काही भरीव योगदान देण्यासाठी त्यांनी मिळून गेल्या वर्षी ‘मेकशिफ्ट’ची स्थापना केली. डिजाइन थिंकिग, इनोव्हेशन इको सिस्टीममधील आपल्या कामाला सुरुवात केली. प्रशिक्षण, शिबिरे आयोजित केली.
याबरोबरच एकीकडे आपल्या डिजाइन थिंकिंगमधील अनुभवाच्या आधारे, शिक्षणक्षेत्रातील येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यायचे या प्रश्नांवर त्यांचा विचार चालू होता. शैक्षणिक क्षेत्रात काही ना काही वाटा उचलणाऱ्या प्रत्येक घटकाला यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या डोक्यात एक योजना तयार होत होती.
कोविडचे संकट सामोरे आल्यावर, अन् शैक्षणिक क्षेत्रावरील येऊ घातलेली आपदा बघितल्यावर या योजनेला मूर्तरूप मिळाले. या नव्या देशव्यापी सर्वसमावेशक उपक्रमाचे नाव होते, ‘नेक्स्ट एज्युथॉन’
काय आहे नेक्स्ट एज्युथॉन?
नावीन्यपूर्ण संकल्पनेवर मॅरेथॉन धावल्यासारखे सलगपणे काम करणे म्हणजे हॅकेथॉन. हॅकेथॉन प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक वापरली जाते. समस्यांवर उत्तरे जलद शोधण्याची ही सामूहिक पद्धती आज जगभर अवलंबली जाते; पण ही हॅकेथॉन फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरती सीमित होती. इतर मूलभूत प्रश्नांची या पद्धतीने उत्तरे शोधण्याची कल्पना अभूतपूर्व होती. बदल घडवू पाहणाऱ्या सर्वांना यात प्राधान्य मिळेल अशी काही तरी प्रक्रिया तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. अन् शैक्षणिक क्षेत्रात रुजू पाहणाऱ्या नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे व त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात मदत करणे हेही घडवून आणायचे होते.
यात सर्वांत महत्त्वाची होती, ती आयडियाची कल्पना!
‘आम्ही जेव्हा समस्यांचा आवाका जाणून घेण्याची ही अभिनव कल्पना मांडली, तेव्हा कुणीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही; पण आम्ही यावर ठाम होतो. आमच्या या छोट्याशा कल्पनेने एका रात्रीत क्रांती नक्कीच घडणार नव्हती; पण बदल घडवण्याची क्षमता तिच्यात होती. एका छोट्या कल्पनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे चालत आलेली जुनाट मानसिकता बदलणे महत्त्वाचे होते. महागडे तंत्रज्ञान वापरून, प्रचंड पैसा ओतून एखाद्या गोष्टीवर काम करण्यापेक्षा उत्तम कल्पना वापरून समस्येच्या मुळाशी आम्हाला जायचे होते. क्षेत्रातून आलेल्या विविध वयोगटातील लोकांना तज्ज्ञांच्या साहाय्याने बदल घडवण्यात सहभागी करून घेणे आमचे स्वप्न होते,’ शर्वरी अन् रुचिरा सांगतात.
हे स्वप्न त्यांनी अनेक तज्ज्ञांना बोलून दाखवले. त्याचा पाठपुरावा केला, एक सूत्रबद्ध आराखडा बनवला अन् अधिकाधिक सहभागासाठी सोशल मीडियावर आवाहन केले. आर्थिक पाठबळाची अपेक्षा न करता केलेल्या या आवाहनाला विविध स्तरांतून भरघोस प्रतिसाद मिळाला, अन् उभी राहिली जगातली पहिली शिक्षण विषयक हॅकेथॉन NEXT EDUTHON
दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली नावनोंदणी, दीडशेपेक्षा अधिक शॉर्टलिस्टेड सहभागी, स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या देशभरातील वीसपेक्षा अधिक संस्था, पंधराहून अधिक चर्चासत्रे, अठरा दिवस, वीसपेक्षा अधिक अध्ययनसत्रे, तज्ज्ञांनी आयोजित केलेली शंभरपेक्षा जास्त सत्रे, अंतिम फेरीत निवड झालेले तीस सहभागी, २९ समस्यांवर प्रश्न मंथनातून निघालेले समाधानकारक उपाय, पाच सजीव कृती आराखडे, अन् शेवटी या सगळ्याचा परिपाक म्हणून झालेली चर्चा… ही होती NEXT EDUTHON.
या प्रक्रियेत सहभागी व्यक्तींकडून कोणतेही शुल्क आकारले गेले नव्हते, कोणत्याही जाहिरातीसाठी, सत्रासाठी कोणताही खर्च केला गेला नाही. यामागे एकही पैसा न घेता वीसहून अधिक स्वयंसेवकांची यंत्रणा कार्यरत होती, अन् शर्वरी आणि रुचिरा या ‘मेकशिफ्ट’च्या संस्थापिका तीन महिने अविरत झटत होत्या.

बदलाचे वारकरी
‘प्रत्येक छोटासा बदल मोठ्या यशाचा भाग असतो.’
या प्रक्रियेच्या सर्वांत पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना अनेक नवीन अनुभव आले. एखादी नावीन्यपूर्ण कल्पना सुचण्यासाठी सुसूत्र प्रक्रियेची असणारी आवश्यकता लक्षात आली. त्यासाठी लागणारा चौफेर विचार, अनेक शक्यता अन् मर्यादा लक्षात घेऊन अंतिम उपाय शोधण्याची निकड जाणवली. विविध स्रोत, साहित्य व संशोधन अहवाल धुंडाळून, त्यातील नेमका आशय घेण्याची नीरक्षीरविवेकबुद्धी या निमित्ताने जोपासता आली. अनेक तज्ज्ञांशी साधलेला संवाद, त्यातून मिळालेली प्रेरणा, शैक्षणिक क्षेत्राशी निगडित बहुआयामी प्रश्नांचा नव्याने झालेला विचार अन् एकंदरीत सर्वांनी मिळून एखाद्या नावीन्यपूर्ण प्रक्रियेतून जाण्याचा आनंद, हे सारे अविस्मरणीय होते.
अंतिम फेरीत निवड झालेल्या व्यक्तींमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अयान, दहावीतल्या आयुष अन् रियापासून, शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या शिल्पा मॅडम व दीपेश सरांपर्यंत अनेक वयोगटाच्या व्यक्तींचा सहभाग होता. या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप अन् स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
महत्त्वाचे म्हणजे आयोजक, तज्ज्ञ, सहभागी या भूमिकांतून मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता, ही एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून बदलाचे वारकरी होण्यात नारीशक्तीचा वाटा फार मोठा आहे. हे सारे बदलाचे वारकरी आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहेत अन् त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व पाठिंबा मिळणार आहे, हे निश्चितच आहे.
या उपक्रमामुळे अनेकांना शिक्षणक्षेत्रातील ज्ञात व अज्ञात अशा समस्या शोधून काढण्यासाठी एक नवीन दृष्टी मिळाली आहे. मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या अनेक प्रश्नांना समोर आणता आले आहे. या साऱ्या विचारमंथनातून आताच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी दिशा मिळेल. सकारात्मक बदल घडवण्यासाठी चालना मिळेल.
या प्रक्रियेतून अंतिम फेरीतील उपाय योजनेला चालना देणारे, सर्व समाजासाठी आशा देणारे आहेत, #Hope ambassadors आहेत. या प्रक्रियेतून काढण्यात आलेल्या विविध सोल्युशनना प्रत्यक्षात उतरवले जाणार असून, त्यांचा आराखडा सामाजिक स्तरावर राबवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अन् सहभागी सर्व संस्थांचा पाठिंबा मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक संसाधने जमावण्यात व कृती करण्यापासून त्याचा परिणाम साधेपर्यंत ही प्रक्रिया अव्याहत सुरूच राहणार आहे.
या प्रचंड यशस्वी झालेल्या उपक्रमानंतर, मेकशिफ्ट ही संस्था भविष्यात असे नवनवीन शैक्षणिक उपक्रम घेऊन येणार आहे, ज्यामध्ये सर्वांना सहभाग नक्कीच घेता येईल. या मंथनातून सर्वांना प्रेरणा मिळेल. या अभूतपूर्व परिस्थितीत उपाय शोधून काढण्याची दिशा मिळेल,
अन् या व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहणाऱ्या सर्व ‘राजूं’ना बदल घडवण्यासाठी चालना मिळेल, हेच पसायदान!!
‘मेकशिफ्ट’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या फेसबुक पेजला, तसेच खालील संकेतस्थळांना भेट द्या.
https://makeshiftdc.com
https://nexteduthon.in/
- सिद्धी नितीन महाजन
(नेक्स्ट एज्युथॉनमध्ये सहभागी झालेल्या आणि एज्युथॉनच्या होप अँबेसेडर)
………