गृह विलगीकरण सात दिवसांचे करावे; चाकरमान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

याबाबत चाकरमान्यांच्या वतीने हातदे (ता. राजापूर) येथील मुंबईतील रहिवासी एकनाथ महादेव नार्वेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की गणेशोत्सवासाठी आम्ही कोकणात गावी येणार आहोत. त्यासाठी आपण तयार केलेली नियमावली काय आहे, हे अजून कळले नाही. गावी आल्यानंतर १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल, असे याआधीच्या नियमांमध्ये लिहिले आहे. प्रत्यक्षात किती दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे, हे समजत नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे, की फक्त सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. याबाबत आपण योग्य तो खुलासा करावा. आम्ही ऑगस्ट महिन्यात गावी येणार आहोत. गावी आल्यानंतर आम्ही आमची आणि आमच्या कुटुंबाची काळजी घेणार आहोत. त्याबाबत कोणतेही दुमत नाही. मुंबईहून निघताना आम्ही डॉक्टरकडून शारीरिक त्रास नसल्याबाबतचा दाखला घेणार आहोत. आम्ही मुंबईत सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये राहत नसल्याचा दाखलासुद्धा घेणार आहोत. एवढे सर्व असताना आम्हाला १४ दिवस गृह विलगीकरण कशासाठी पाळावे लागणार आहे, हे समजत नाही. सर्व नियम लक्षात घेऊन गावी आल्यानंतर केवळ सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचा नियम जाहीर करावा, असे श्री. नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्राची प्रत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, सरपंच आणि ग्राम कृती दलालाही पाठविण्यात आली आहे.

गणेशोत्सवाबाबत कोणतेच नियम राज्य शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे स्पष्टपणे जाहीर करण्यात आले नसल्याने चाकरमान्यांच्या या पत्राची दखल जिल्हाधिकारी घेतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
……

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply