रत्नागिरी : आज (१३ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ९१२ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ६२७ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२१ जणांनी करोनावर मात केली असून, सध्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीतील आज (१३ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एका ७० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल समाविष्ट आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्यू झालेल्यांची संख्या ३२ झाली आहे. या महिला रुग्णाला राजिवडा येथून काल (१२ जुलै) जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा आज मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज बरे झालेल्यांमध्ये दापोलीतून १२, घरडा येथून ११, जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून १, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे येथून ३ आणि समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून ११ जणांना घरी सोडण्यात आले.
ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१९ असून, त्यापैकी १९९ रुग्ण रुग्णालयात दाखल, तर १३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. चार रुग्ण इतर जिल्ह्यांत उपचारांसाठी गेले आहेत. तिघे रुग्ण दाखल होणे बाकी आहे. त्यात आत्ताच हाती आलेल्या ३५ रुग्णांची भर पडली आहे. या नव्या ३५ रुग्णांमध्ये रत्नागिरीतील दोन, कामथे येथील १४, कळंबणीतील पाच, गुहागरमधील सहा आणि दापोलीतील सात रुग्णांचा समावेश आहे.
आज पूर्ण गद्रे कंपनीऐवजी गद्रे कंपनीतील कॅबस्टिक प्लांटचा परिसर आणि शिरगाव हे क्षेत्र करोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यासह जिल्ह्यात ८२ ॲक्टिव्ह कन्टेनमेन्ट झोन आहेत. त्यांचे तालुकानिहाय विवरण असे – रत्नागिरी २३, दापोली ७, खेड १८, लांजा ६, चिपळूण २०, मंडणगड २ आणि राजापूर तालुक्यात ६ गावे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १४ जणांना करोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बऱ्या झालेल्या करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२१ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
…..
