चाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनला आता चार महिने होत आले आहेत. अजूनही ते वाढविण्यात येत आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे,पुण्यासह राज्यभरात राहणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे अथवा राज्य शासनाची परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. याचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सर्वसामान्यांची लूटमार केली जात आहे. जिल्हाबंदीमुळे ई-पास बंधनकारक केला आहे. हा पास सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नसून, दलालांमार्फत मात्र तो उपलब्ध होतो. त्यातही सर्वांची राजरोसपणे लूट सुरू असून कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या सर्वाचा आर्थिक भुर्दंड मात्र सर्वसामान्य चाकरमान्यांना बसत आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. नोकरी, व्यवसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यात राहत असलेला चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जून कोकणात जातो. दर वर्षी रेल्वे आणि एसटी बससेवा सुरू असल्याने त्याला जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. या वर्षीची परिस्थिती पाहता रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता वाटत नाही. अशा वेळी राज्यांतर्गत परिवहन सेवाही सुरू झाली नाही, तर अडचणी अधिक वाढणार आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाउनमुळे नोकऱ्या, व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आले आहेत. गावी जाण्यासाठी केवळ खासगी वाहतुकीचा पर्याय राहिल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड चाकरमान्यांना पडणार असून, सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राज्यांतर्गत सवलतीच्या दरात बससेवा उपलब्ध करावी लागणार आहे.

राज्यातील जनतेने लॉकडाउन काळात गेले चार महिने संयम राखून करोनाच्या लढ्यात शासनाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. आता किमान सवलतीच्या दरात गणेशोत्सवानिमित्त तरी परिवहन सेवा सुरू करावी, अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून कोकणासह राज्यात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची बससेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, शक्य असल्यास केंद्राकडे कोकणासाठी खास रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी करावी. तसेच करोनाबाबत अधिक काळजी घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या सर्व चाकरमान्यांची मोफत वैद्यकीय चाचणी घेऊन सर्वांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा, असे श्री. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
……


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply