रत्नागिरीत दिवसभरात करोनाचे ४८ नवे रुग्ण; सिंधुदुर्गात दोन दिवसांत नवा रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स या एकाच कारखान्यातील ४० जणांना करोनाची बाधा झाल्याचे आज (१४ जुलै) स्पष्ट झाले आहे. तेथील कामगारांची तपासणी खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली होती. त्याशिवाय, रत्नागिरी येथील तीन आणि लांजा येथील पाच असे दिवसभरात ४८ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ९६० झाली आहे. रत्नागिरीत दाखल असलेल्या एका करोनाबाधिताचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ३३ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील सात रुग्णांना बरे झाल्यानंतर आज (१४ जुलै) घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या ६३४ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर, समाज कल्याण, रत्नागिरी येथील ४, तर जिल्हा रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. १४ जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या स्थितीनुसार, जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९६० असून, एकूण २९३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांखाली आहेत. आज बसणी, साळवी स्टॉप परिसर हे क्षेत्र करोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या ७८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २१ गावांमध्ये, दापोलीत आठ, खेडमध्ये १८, लांजा तालुक्यात सहा, चिपळूण तालुक्यात १६ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात ३ आणि राजापूर तालुक्यात ६ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

छायाचित्रकार संजीव साळवी यांचे निधन
रत्नागिरीत आज झालेला मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे शासकीय अहवालात म्हटले आहे. नियमानुसार रुग्णाचे नावही देण्यात आलेले नाही; मात्र मिळालेल्या माहितीनुसार तो रुग्ण म्हणजे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध छायाचित्रकार संजीव साळवी (वय ४८) होत.

संजीव साळवी

गेले काही दिवस साळवी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा होत होती; काल (१३ जुलै) त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळत होती; मात्र आज (ता. १४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांचे निधन झाले.

संजू साळवी यांनी फोटोग्राफी क्षेत्रात नाव कमावले होते. रत्नागिरीबरोबर गोव्यातही त्यांचे फोटोग्राफी क्षेत्रात मोठे काम होते. मॉडेलिंग फोटोग्राफी क्षेत्रात त्यांचे नाव होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक ऑर्केस्ट्रामधून मिमिक्री आणि गायन केले होते. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केली होती. आज त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसला. रत्नागिरीतील उमद्या छायाचित्रकाराचे निधन झाल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. फोटोग्राफर संघटनेतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ जुलैनंतर करोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. तेथील एकूण करोनाबाधितांची संख्या २५८ असून, सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२४ जणांनी करोनावर मात केली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण मुंबईत उपचारांसाठी गेला आहे.
……..

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply