बारावीत सलग नवव्या वर्षी कोकण विभागीय मंडळ प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने ९५.८९ टक्के निकालासह सलग नवव्या वर्षी पहिले स्थान आणि त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९६.५७ टक्के निकालासह राज्यातील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९५.८९ टक्के आणि फेरपरीक्षार्थींचा निकाल ४१.८३ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालात २.६६ टक्के वाढ झाली आहे.

परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला असून, विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशी – पुणे ९२.५०, नागपूर ९१.६५, औरंगाबाद ८८.१८, मुंबई ८९.३५, कोल्हापूर ९२.४२, अमरावती ९२.०९, नाशिक ८८.८७, लातूर ८९.७९, कोकण ९५.८९.

यावर्षी १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली; मात्र करोना संकटामुळे पेपर तपासणीस विलंब झाला. करोनाचे संकट अजूनही कायम असल्याने निकाल जाहीर करण्यासाठी कोकण मंडळाने पत्रकार परिषद न घेता निवेदनाद्वारे निकाल जाहीर केला. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५७, कला शाखेचा ९०.८, वाणिज्य शाखेचा ९७.८९, तर व्यावसायिक विषयांचा निकाल ९५.२९ टक्के लागला.

या वर्षीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील १५३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यासाठी अनुक्रमे ३७ आणि २३ अशी एकंदर ६० परीक्षा केंद्रे होती. दर वर्षीप्रमाणे कोकण मंडळात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यंदा मुलांचे प्रमाण ९२.४० टक्के, तर मुलींचे प्रमाण ९७.२० टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १९ हजार ६०७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार ७२८ (९५.५२ टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षेला बसलेल्या १० हजार ५३६ पैकी १० हजार १७५ (९६.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा निकाल ९४.२६ टक्के होता. या वर्षी त्यातही वाढ झाली आहे. यंदादेखील उत्तीर्णतेमध्ये जिल्ह्यातील मुलींनी यंदाही आघाडी घेतली आहे. मुलींची टक्केवारी ९८.१२ टक्के तर मुलांची ९५.१३ टक्के आहे. या वर्षी कोकण मंडळात एकही गैरप्रकार झाला नसल्याचे मंडळाने आवर्जून नमूद केले आहे.

गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलै, तर छायाप्रतीसाठी पाच ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. तसेच त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल. गुणपडताळणी अर्ज मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना स्वतः किंवा शाळा, महाविद्यालयामार्फत भरता येतील.
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply