रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तिघा करोनाबाधितांचा मृत्यू; एकूण संख्या १०७०

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जुलै) एकाच दिवशी तिघा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर नवे २१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील एकूण बाधितांची संख्या १०७० झाली असून, ३६८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २६५ झाली असून, २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गात कोविड-१९ टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज (१६ जुलै) सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आढळलेले नवे सर्व २१ रुग्ण खेड तालुक्यातील घरडा केमिकल्सचे कामगार आहेत. त्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या एक हजार ७० झाली आहे, तर घरडा केमिकल्समधील एकूण बाधितांची संख्या ८१ झाली आहे. काही ठिकाणच्या बातम्यांमध्ये आज दिवसभरात रत्नागिरीत ८१ नवे रुग्ण सापडल्याचा उल्लेख होता; मात्र वस्तुस्थिती तशी नसून घरडा कंपनीतील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ८१ झाली आहे, असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

आज तिघांच्या मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. त्यामध्ये रत्नागिरीतील घुडेवठार येथील ५६ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. त्या रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मरण पावलेला दुसरा रुग्ण मिरजोळे एमआयडीसीतील आहे. त्याचे वय ६५ वर्षे होते. आणखी एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला; मात्र त्याची माहिती सायंकाळपर्यंत मिळाली नव्हती. करोनाबाधित मृतांची संख्या आता ३७ झाली आहे.

दरम्यान आज १० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६५ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ९, तर समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६८ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २६५ झाली असून, २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २३४ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्गात कोविड-१९ टास्क फोर्सची निर्मिती
कोविड-१९ आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नियंत्रणाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड-१९ या आजाराने ग्रस्त असलेल्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता निश्चित करणे, याबाबत उपाययोजना निश्चित करणे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे यासाठी टास्क फोर्स काम करणार आहे.

या टास्क फोर्समध्ये शासकीय, तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये समावेश असलेल्या डॉक्टर्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत. – डॉ. शंतनू तेंडोलकर (एमडी मेडिसीन), डॉ. वादीराज सवदत्ती (एमडी ॲनेस्थेशिया), डॉ. बी. जी. शेळके (एमडी चेस्ट व टीबी), डॉ. सोनल घोगळ (एमडी मायक्रोबायोलॉजी), डॉ. महेश खलिपे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. श्रीपाद पाटील (वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय), डॉ. विवेक रेडकर (एमडी मेडिसीन)
……

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply