रत्नागिरी : जिल्ह्यात काल रात्रीपासून आज (१८ जुलै) रात्री नऊपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ८० रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २७२ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
नव्या ८० रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२१० झाली आहे. याशिवाय ॲन्टीजेन टेस्टद्वारे चार रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. ८०पैकी ४६ पॉझिटिव्ह अहवाल आज (१८ जुलै) रात्री नऊ वाजता मिळाले असून, त्यापैकी रत्नागिरीतील सात, कामथे येथील १८, दापोलीतील दोन, कळंबणीतील चार, गुहागरातील तीन, तर घरडा केमिकल्समधील १२ जणांचा समावेश आहे. घरडा केमिकल्समधील करोनाबाधितांची संख्या आता ११० झाली आहे.
दरम्यान, २६ रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७०८ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयातील १३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथील तीन, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली येथील एक आणि समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील चौघांचा समावेश आहे.
दापोलीतील एका करोनाबाधिताचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तो रुग्ण रत्नागिरीत दाखल होता. त्याच्या निधनामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या आता ४१ झाली आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आतापर्यंतच्या करोनाबाधितांची एकूण संख्या २७२ झाली आहे. त्यापैकी २८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. २३८ जणांनी करोनावर मात केली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईत उपचारांसाठी गेला आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख ३८ हजार ६५४ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
….
