गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे व कर्मभूमी मुंबई असलेल्यांना सण-उत्सवासाठी त्यांच्या जन्मभूमीतील रक्ताच्या नात्याचे काही सवंगडी याआधी त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या अंथरत असत. सणासुदीला हेच मुंबईकर बहुतांश घरांमधील आर्थिक गरजा भागवत असतात, हा गेल्या वर्षापर्यंतचा इतिहास आहे. करोना महामारीमुळे हेच रक्ताचे नाते त्यांच्या विरोधात उभे ठाकल्यासारखी स्थिती आहे. रोगाशी लढा, रोग्यांशी नको असा नारा शासन एकीकडे देत असताना प्रशासन मात्र काट्यांच्या पायघड्या घालणाऱ्याची री ओढत फरपटत चालल्याची चर्चा सुरू आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतून गावात येणाऱ्यांना १४ ऐवजी सात दिवस रूम क्वारंटाइन करण्याची मागणी होत आहे. उत्सवकाळात स्वतःच्याच घरी थांबावे, हा निर्णयही चाकरमानी मान्य करीत आहेत. परंतु १४ दिवसांचे विलगीकरण केल्यास तो मोठा अडथळा ठरणार आहे. हे १४ दिवस उत्सवासाठी आणि आणखी १५ दिवस विलगीकरणासाठी एवढी सुट्टी कशी मिळणार, ही गंभीर समस्या आहे.

मुंबईतून व राज्याच्या इतर भागातून, राज्याच्या बाहेरून दर वर्षी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लाखो चाकरमानी येतात. या वर्षी करोनामुळे ही संख्या ५० टक्के घटेलही. परंतु येणाऱ्या गणेशभक्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडून काय नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती पुरेशी आधी जाहीर होणे आवश्यक आहे. त्याबाबत केवळ स्थानिकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येऊ नयेत. निर्णय सर्वसमावेशक, सर्वांना मान्य असेल आणि करोनाचा प्रसार रोखण्यास मदत करणारा असावा. करोनाचे संकट मोठे आहे व ते दूर करण्यासाठी उपायही करावेच लागणार आहेत; मात्र उत्सवकाळातील धोरण चाकरमान्यांनी गावात येऊच नयेत, मुंबईतूनच गावच्या गणपतीला त्यांनी नमस्कार करावा, असे असू नये, हीच भक्तांची भावना आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे. उत्सवाला महिना उरला आहे. याबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे. सुस्पष्ट निर्णयाची सर्वांना अद्यापही प्रतीक्षा आहे.

मुंबईकर चाकरमान्यांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातून शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारेही अनेक जण आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने ते रत्नागिरीत स्थायिक झाले असले, तरी गणेशोत्सवासाठी ते आपल्या गावी जाणार आहेत. जिल्हाबंदी अजूनही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनाही होम क्वारंटाइन करणार का, हाही प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या गावी उत्सवासाठी जाऊ इच्छितात आणि ज्यांना मुंबई किंवा इतर प्रवासाचा गेल्या चार महिन्यांचा इतिहास नाही, त्यांना क्वारंटाइनमधून सवलत मिळणे आवश्यक आहे. कारण दोन्ही जिल्ह्यांमधील करोनाची स्थिती सारखीच आहे. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत सिंधुदुर्ग मित्रमंडळे आहेत. त्यांनीही याबाबत कोणत्याच हालचाली सुरू केल्याचे सध्या तरी दिसत नाही.
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply