अभ्यंकर विद्यामंदिराने जपली दीप अमावास्येला दिव्यांच्या प्रदर्शनाची प्रथा

रत्नागिरी : आषाढ अमावास्या तथा दीप अमावास्येचे औचित्य साधून रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात प्राचीन काळापासूनच्या दिव्यांचे प्रदर्शन दर वर्षी मांडण्यात येते. २० जुलै रोजी दीप अमावास्या आहे; पण करोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रदर्शनाचा आढावा घेणारा एक व्हिडिओ शाळेने सर्व विद्यार्थ्यांना पाठवला आहे आणि या प्रदर्शनाच्या प्रथेत खंड पडू दिलेला नाही. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास पाठवून ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे. बुद्धीचा दिवा प्रज्ज्वलित होवो आणि शास्त्रज्ञांना करोनावर लस मिळो आणि जग करोनामुक्त होवो, अशी प्रार्थना दिव्याजवळ करण्यात आली आहे.

प्रत्येक अमावास्या आपल्याला वेगळेपण शिकवते. अमावास्या झाली, की दुसऱ्या दिवसापासून पुन्हा प्रकाशाची वाट चालायला सुरुवात होते. त्यानुसार दीप अमावास्येनंतर करोना संकटातून बाहेर पडायला मार्ग मिळावा. दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या नष्ट होऊन सगळ्यांना चांगली बुद्धी मिळो, अशी प्रार्थना शाळेने या व्हिडिओतून केली आहे. करोनामुळे घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यातून देण्यात आला आहे.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर आणि संचालक सौ. विशाखा भिडे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या संकल्पनेतून गेली दहा वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थी घरी असले, तरी या कार्यक्रमाचा वास्तवदर्शी अनुभव विद्यार्थी आणि पालकांना घेता यावा, यासाठी मागील वर्षांच्या कार्यक्रमांचा व्हिडिओ करून तो विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला आहे. या व्हिडिओची निर्मिती माजी विद्यार्थी राज नारकर आणि मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी केली आहे. त्यासाठी व्यवस्थापक दिलीप भातडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोविड १९ विलगीकरण केंद्रात संस्थेच्या शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवा देत राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. जनतेनेही शासकीय नियम पाळून, मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून सहकार्य करावे, असे आवाहन शाळा व संस्थेने केले आहे.

या प्रदर्शनात गारगोटीचे दगड आणि त्रिपूर, समई, निरांजन, दगडी, मातीचे दिवे, तेलाचे दिवे, कुरवंडीचा दिवा, मेणबत्ती, बत्ती, कंदील, आधुनिक काळातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांचा समावेश असतो.
……

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply