ग्रामपंचायतीवर मर्जीतील व्यक्तीस प्रशासक नेमणुकीस कडक विरोध : माजी आमदार बाळ माने

रत्नागिरी : जनता करोनाच्या महामारीने हैराण झाली आहे. त्यातच, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या अधिकारात प्रशासक नेमणे, ही बाब म्हणजे राजकीय पोळी भाजून घेण्याचा आघाडी सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. याला रत्नागिरी जिल्ह्यातून भारतीय जनता पक्ष कडक विरोध करणार आहे. कुणाचीही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी दिला.

कायद्यात योग्य ते बदल करून विद्यमान सरपंचांनाच मुदतवाढ द्या, असे स्पष्ट मतही बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. या संदर्भात माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले, की घटनेत विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांना मुदतवाढ देता येत नसेल, तर त्यासाठी कायद्यात योग्य तो बदल सरकारने करावा. हे लोकशाही राज्य असल्यामुळे जनतेने निवडून दिलेले सदस्य व सरपंचांना पुढील कालावधीसाठी मुदतवाढ मिळाली पाहिजे. गेली पाच वर्षे हे सरपंच, सदस्य ग्रामविकासाचे काम करत आहेत. प्रशासक नियुक्तीला विरोध असल्याचे सांगत अनेक सरपंचांनी आपल्याशी संपर्क साधला असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी आपल्याशी संपर्क साधला असून, वेळ आल्यास आपणही जिल्ह्याच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, अशी भूमिका बाळ माने यांनी घेतली आहे.

राज्य सरकार एवढा मोठा निर्णय समन्वयाने न घेता हेतुपुरस्सर राजकारण करून आपल्या मर्जीतील व्यक्तीची नेमणूक करून घाणेरडे राजकारण करू पाहत आहे. राज्य शासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा. याविरोधात भाजपच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केल्याची माहितीसुद्धा बाळ माने यांनी दिली.
…..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply