हिंदू मृतदेहावरील अग्निसंस्कारासाठी मुस्लिम बांधवांचे सहकार्य
रत्नागिरी : माणुसकीला धर्म नसतो, किंबहुना माणुसकी हाच माणसाचा खऱा धर्म असतो. त्याचे प्रत्यंतर रत्नागिरीच्या स्मशानभूमीत मंगळवारी (२१ जुलै) आले. हिंदू मृतदेहावरील अग्निसंस्कारासाठी मुस्लिम बांधवांनी सक्रिय सहकार्य केल्याने माणुसकीचा हा धर्म स्मशानातही उजळून निघाला.
युनिक फाउंडेशन ही संस्था गेली तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहे. जात-धर्म न पाहता केवळ माणुसकी जपण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेचे शिलेदार गरजूंसाठी विनामूल्य काम करीत आहेत. असेच एक मोठे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पार पाडले.
मूळचे जळगावचे रहिवासी, पण खेडमध्ये स्थायिक झालेले रिक्षाचालक प्रभाकर वाघ यांना दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सर्वत्र पसरलेल्या करोनाची बाधा त्यांना झालेली नव्हती. आजारपणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांची करोनाविषयक चाचणी घेण्यात आली होती. ती निगेटिव्ह होती. पण इतर रोगांनी ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच २० जुलैला रात्री त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अवघ्या १५ वर्षांचा मुलगा होता. अशा कठीण प्रसंगात जवळचे नातेवाईक सर्व व्यवस्था करतात. पण करोनाच्या स्थितीमुळे त्यांचे कोणीही नातेवाईक जिल्हा रुग्णालयात येऊ शकले नाहीत. पत्नी आणि कोवळ्या मुलाने ती रात्र जिल्हा रुग्णालयात तशाच हतबल अवस्थेत काढली.
जिल्हा रुग्णालयात सेवेसाठी सदैव सज्ज असलेल्या संकल्प युनिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ही बाब कळली. फाउंडेशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी संस्थेच्या युवा शाखेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांना ते कळविले. ते तातडीने जिल्हा रुग्णालयात हजर झाले. त्यांनी प्रभाकर वाघ यांची पत्नी आणि मुलाची भेट घेतली. त्यांना धीर दिला. कोणीही नातेवाईक येणे शक्य नसल्याने त्यांचा मृतदेह वाघ कुटुंबीय सध्या राहत असलेल्या खेडमध्येही नेणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेहावर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करा, अशी विनंती कुटुंबीयांनी केली. राजू भाटलेकर यांना सोबत घेऊन सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर प्रभाकर वाघ यांचा मृतदेह शववाहिकेतून रत्नागिरीच्या पांढरा समुद्र स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे दिलावर कोंडकरी, शकील गवाणकर, इस्माइल नाकाडे, सईद मुल्ला, युसुफ शिरगावकर यांनी आपल्या खांद्यावरून मृतदेह सरणापर्यंत नेला. हिंदू पद्धतीनुसार चिता रचली. मुलाने अग्नी दिला. अशा तऱ्हेने मुस्लिम बांधवांच्या सक्रिय सहकार्याने हिंदू मृतदेहावरील अंत्यसंस्कार पार पडले. त्यासाठी आवश्यक तो सर्व खर्चही पदरमोड करून मुस्लिम बांधवांनी केला.
अंत्यसंस्कारावरच सारे थांबले नाहीत. अग्निसंस्कार झाल्यानंतर २२ जुलै रोजी अस्थिसंचयनाचा विधी (सारी भरणे) होणार आहे. तेव्हा तोपर्यंत वाघ यांच्या पत्नी-मुलाची राहण्याची व्यवस्था संकल्पच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने एका लॉजवर केली आहे.
मुस्लिम बांधवांचे हे कार्य आदर्शवत आहे. राजू भाटलेकर व उमेश कुलकर्णी यांनीही त्यांना मोलाचे सहकार्य केले.