आडिवरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जुन्या पिढीतील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक आणि सच्चे सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाऊकाका जोशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सुहृद रविकिरण गजानन भिडे यांनी त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी लिहिलेला हा लेख…
……
‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ ही पंक्ती खऱ्या अर्थाने ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे डॉ. कै. भाऊकाका जोशी. १६ जुलै २०२० रोजी सकाळी ११च्या दरम्यान आईचा फोन आला. तिने सांगितले, ‘भाऊकाकांची तब्येत जास्त आहे.’ हे वाक्य ऐकताच मनात चलबिचल सुरू झाली. चैन पडेना. पुन्हा सायंकाळी फोन आला. आईने सांगितले, ‘भाऊकाका यांचे साडेतीन वाजता निधन झाले.’ बातमी ऐकताच मनात धस्स झाले, हृदयाचा ठोका चुकला. गडबडून गेलो. तेवढ्यात धन्वंतरीचा मेसेज आला. ‘असा गडबडून काय करतोस? चाळीस वर्षे मागे वळून बघ. भाऊकाकांच्या आठवणी मन:पटलावर पुन्हा आण. नवीन पिढीला त्यांचे योगदान समजू दे. आता कामाला लाग. घे लेखणी व लिहून काढ त्यांच्या रम्य आठवणी!’
धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. आयुर्वेदात धन्वंतरीला विशेष महत्त्व आहे. या धन्वंतरीनेच समस्त आडिवरेवासीयांच्या सेवेसाठी आपला एक दूत पृथ्वीवर पाठविला. तो देवदूत म्हणजेच डॉ. भाऊकाका जोशी. भाऊकाकांच्या रम्य आठवणी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखातून करणार आहे. शब्द मोडकेतोडके असतील, परंतु त्यातील आशय महत्त्वाचा आहे.
डॉ. भाऊकाका जोशी म्हणजेच भालचंद्र हरी जोशी. जोशी कुटुंबात जन्मलेले एक नररत्न. त्यांचे वडील म्हणजेच भिषग्वर हरी रामचंद्र जोशी हे जुन्या काळातील एक नामांकित वैद्य. भाऊकाकांचे थोरले बंधू (कै.) रामभाऊ जोशी यांनीही निष्णात वैद्य म्हणून लौकिक मिळवला होता. असा वैद्यकीय वारसा लाभलेल्या कुटुंबात भाऊकाकांचा जन्म झाला. प्रचंड मेहनत घेऊन भाऊकाका डीएएसएफ झाले व आडिवऱ्यासारख्या गावात सुमारे साठ वर्षांपूर्वी त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
आत्ताचे आडिवरे व तेव्हाचे आडिवरे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. त्या काळी फारशा सोयीसुविधा नव्हत्या. वाहने नव्हती. चालणे किंवा बैलगाडी एवढाच पऱ्याय उपलब्ध होता. वैद्यकीय सोयीसुविधाही फारशा नव्हत्या. वैद्यकीय तपासणीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध नव्हती. अशा अवघड प्रसंगात डॉक्टरांनी प्रॅक्टिस सुरू केली. हर्चे, भडे, डोर्ले, बेनगी, तिवरे, भराडे, कशेळी, रुंढेतळी, कोंडसर, नवेदर इत्यादी ठिकाणी चालत जाऊन सेवा देणारे एकमेव डॉक्टर म्हणजे भाऊकाका जोशी. संपूर्ण प्रॅक्टिसमध्ये भाऊकाकांची एकूण चाल किती झाली हे ठरविण्यासाठी गणितातील परिमाणही अपुरे ठरेल. त्या काळी फोनही नव्हते. लांबच्या पेशंटचा निरोप आला, की तात्काळ भाऊकाका त्या ठिकाणी दाखल व्हायचे. मग रात्र असो की दिवस. त्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. सदैव सेवेसाठी तत्पर असायचे. रात्री-अपरात्रीही पेशंट तपासणारे व गरिबांचे डॉक्टर म्हणजे भाऊकाका जोशी.
‘दार घराचे सदैव उघडे, वात्सल्याची ध्वजा फडफडे.’ भाऊकाकांची रुग्ण तपासण्याची खोली हायफाय नव्हती. परंतु त्या खोलीत संस्कारांची शिदोरी होती. ‘आम्ही प्रयत्न करतो, ईश्व र बरे करतो’ यांसारखी वाक्ये लक्ष वेधून घेत असत. जीवन खऱ्या अर्थाने कसे जगायचे याचे शिक्षण देत असत. माणसे घडवण्याचे काम तिथून झाले, हे नक्की. निसर्गरम्य वातावरणात रुग्ण तपासण्याचे काम डॉ. भाऊकाका करीत. ‘उत्कृष्ट नाडीपरीक्षा’ हे भाऊकाकांचे खास वैशिष्ट्या. आयुर्वेद व अॅीलोपॅथी यांचा सुरेख मेळ त्यांनी घातला. ‘शक्यतो इंजेक्शन द्यायचे नाही’ हा त्यांचा एक विचार. केवळ एक ते दोन औषधांत पेशंट बरा करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांच्या बोलण्यानेच पेशंट निम्मा बरा होत असे. साइड इफेक्ट न होणारी औषधे ते वापरत असत. लघुवात, सूतशेखर, लवंगादिवटी, अग्निकुमार, सितोपलादी चूर्ण, आनंदभैरव, चंद्रप्रभावटी, पॅरासिटामोल, डेक्झामेथाझोन, क्रिमाफीन, हिंग्वाष्टक चूर्ण, सायटॉल, न्युरोबियॉन, समीरपन्नग रस, कुटजारिष्ट, विडंगारिष्ट, सिपलिन डी. एस., अँपिसिलीन, महासुदर्शन काढा, त्रिभुवन कीर्ती, डायजीन जेल, आर. डीन ही त्यांची खास औषधे. गप्पा मारता मारता इंजेक्शन कधी देऊन झाले, ते पेशंटला कळतही नसे. अर्थात ते आवश्यक असेल तरच इंजेक्शन देत असत.
‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणजे भाऊकाका जोशी. भाऊकाकांची फीही अगदी अत्यल्पच. दोन रुपयांपासून ते फक्त वीस रुपयांपर्यंत. तीसुद्धा गोरगरिबांना माफ. भाऊकाकांकडे येणारा पेशंट हा वहिनींनी केलेला चहा पिऊनच माघारी वळत असे. वेळप्रसंगी एखाद्या पेशंटची परतीची व्यवस्थाही भाऊकाकाच करीत असत. भाऊकाकांच्या घरी दररोज शेकडो कप चहा हा येणाऱ्या पेशंटकरिताच असे. घरातील सर्व मंडळींचीही साथ त्यांना उत्तम लाभली. त्यांचे घर म्हणजे ‘व्हाइट हाउस’च.
सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ. चहा, जेवण, गप्पा सतत सुरूच असत. उत्तम आदरातिथ्य कसे असावे, याची शिकवण तिथूनच मिळाली. भाऊकाकांनी आयुष्यात फारशी धनदौलत मिळवली नाही. परंतु मिळवले ते लोकांचे प्रेम, आपुलकी. सदैव माणुसकी जपली.
नंतरच्या काळात भाऊकाकांनी फटफटी घेतली. लहानपणी त्यांच्याबरोबर फटफटीवर बसून जाण्यात मला फार मौज वाटे. फटफटीवरून प्रवास करीत-करीत त्यांनी जनसेवा सुरू ठेवली. सतत चालण्याने त्यांचे पाय थकले. तेव्हापासून गेल्या वीस वर्षांत त्यांनी रिक्षाद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यातही रिक्षाचे भाडे पन्नास रुपये; पण भाऊकाकांची फी मात्र वीसच! असे होते त्यांचे नि:स्वार्थी जीवन!
पन्नास ते साठ वर्षे प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा होता. एखादा तरुण पेशंट तपासणीसाठी गेल्यावर त्या पेशंटच्या आजोबा/पणजोबांना कोणता विकार होता, त्यांना कोणती औषधे दिली, याची माहिती ते जाणीवपूर्वक देत असत. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. काही वर्षांनंतर परत आलेला पेशंट पूर्वी कधी आला होता, त्या वेळी त्याला कोणती औषधे दिली होती, हे ते अचूकपणे सांगत असत. वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असत. नवनवीन संशोधन, प्रयोग, औषधे यांची अद्ययावत माहिती ते जाणून घेत असत. आम्हाला विविध औषधांची माहिती कोणी दिली असेल, तर ती डॉ. भाऊकाकांनीच. सर्वसाधारण तक्रारींवर कोणते उपाय करायचे, हे आम्हाला भाऊकाकांनीच सांगून ठेवले आहे. आपणास असलेले ज्ञान इतरांना देण्याची त्यांची प्रवृत्ती होती.
राजापूर हायस्कूलचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त माजी मुख्याध्यापक (कै.) गुरुवर्य द. ज. सरदेशपांडे व (कै.) गुरुवर्य वासूकाका जोशी यांच्या विचारांचा प्रभाव भाऊकाकांवर होता. तसेच बालपणी ‘आरएसएस’चे संस्कार झाल्यामुळे वागणुकीत कमालीची शिस्त होती. वक्तशीरपणा होता. दिलेला शब्द पाळण्याची प्रवृत्ती होती, प्रखर देशाभिमान होता, टापटीपपणा, नीटनेटकेपणाही होता.
सामाजिक क्षेत्रातही भाऊकाकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भाऊकाकांनी खूप मेहनत घेतली. तसेच पोस्ट ऑफिस, ‘बँक ऑफ इंडिया’ची शाखा स्थापन होण्यासाठी अपार मेहनत घेतली. वाडीवाडीतील रस्ते, पाण्याच्या सोयीसुविधा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावातील प्रत्येक कार्यक्रमाला, मग तो सार्वजनिक असो किंवा घरगुती, त्यांची उपस्थिती आवर्जून असायची. आडिवरे हायस्कूल व भाऊकाका यांचे एक अतूट नाते होते. हायस्कूलच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असत. आम्ही विद्यार्थी असताना त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आतुर असायचो. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्नच होती. त्यांचे भाषण संपूच नये असे वाटत असे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असायचे, तेही हलक्याफुलक्या शब्दांत. विनोदी शैली हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. कितीही गंभीर प्रसंग असला, तरी आपल्या विनोदी शैलीमुळे ते सर्वांनाच तणावमुक्त करीत असत.
पूर्णगड पूल होण्यासाठी भाऊकाकांनी अपार मेहनत घेतली. (कै.) ल. रं. हातणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्या काळी हातणकर एकदा म्हणाले होते, ‘डॉ. जोशी राजापूरला भेटले, टोचतात, रत्नागिरीला भेटले, टोचतात, पुलासाठी टोचतात.’ अखेर भाऊकाकांचा प्रयत्न सफल झाला. पूर्णगड पूल पूर्ण झाला. त्या पुलाच्या खांबांजवळ कान नेले, तरी त्यातून ‘भाऊकाका-भाऊकाका’ व ‘हातणकर-हातणकर’ अशी नावे ऐकू येतील, यात तिळमात्र शंका नाही.
भाऊकाकांना रस्त्यावरून जरी जाताना पाहिले, तरी त्यांचे हितचिंतक, पेशंट त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार करीत असत. पेशंटमध्ये आत्मविश्वांस निर्माण करण्याचे काम डॉ. भाऊकाका करीत. ‘हिम्मत से, डरना मत’ हे त्यांचे परवलीचे शब्द.
भाऊकाकांची परमेश्वसरावर नितांत श्रद्धा होती. टेंब्येस्वामी, श्री महाकाली, श्री स्वामी स्वरूपानंद, झेंडे महाराज यांचे ते भक्त होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच ईश्व्री कृपा असावी लागते अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांना अध्यात्माची आवड होती. ते सतत वाचन, मनन, चिंतन करीत असत. त्यांना ज्योतिष शास्त्राचीही आवड होती. पत्रिकेतील ग्रहांचे फल जाणून घेणे, भृगूसंहितेवरून भविष्य पाहणे इत्यादींसाठी अनेक वेळा ते आमच्याकडे पत्रिका घेऊन येत असत. ते उत्कृष्ट हस्तरेषातज्ज्ञही होते. अनेकांचे हात पाहून त्यांना त्यांचे भविष्य सांगितलेले मी स्वत: पाहिले आहे. ते भविष्यही अचूक असायचे.
डॉ. भाऊकाकांचे व आमचे संबंधही अगदी घरगुती आणि जवळचे! आमच्याकडील आंबा-फणसाची साटे, सुकवलेले खोबरे, पाळंदीतील आंबा ते आवर्जून खात असत. आमच्या प्रत्येक सुखदु:खात त्यांचा सहभाग असायचाच. त्याच संदर्भातील दोन-तीन प्रसंग मला सांगावेसे वाटतात. ज्या वेळी आम्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले, त्या वेळी बक्षीस द्यायला, कौतुक करायला भाऊकाका विसरले नाहीत. त्या संदर्भातील काही काव्यपंक्ती मला आठवतात –
कलेकलेने चंद्र वाढतो, बिंदूबिंदूने सिंधू साधतो।
क्षणक्षण जोडो सरस्वतीला, समर्थ जीवन मिळो तुला॥
समर्थ कालीने केले, स्वप्न ओंजळीत आले।
गीत तुझे तर गाता भूषण, मुजरा देईल तुजला जनगण॥
रवी-शशीच्या शुभकिरणांनी, रात चकाके दिन रजनी।
या काव्यपंक्तीतून आपणाला त्यांच्यातील प्रतिभावंत कवी जाणवतो.
डिसेंबर २००२मध्ये मी फणसोप हायस्कूलला नोकरीला लागलो. २००५मध्ये मी नोकरीमध्ये कायम झालो. ती बातमी सांगण्यासाठी मी भाऊकाकांचे घर गाठले. ही आनंदाची बातमी त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी लगेचच वहिनींना सांगितले, ‘अगो, लगेच बाहेर ये. किरण नोकरीत कायम झाला. काही तरी गोड घेऊन ये, लगेचच चहा ठेव.’ जणू काही स्वत:च नोकरीत कायम झाले, असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या वेळच्या त्यांच्याकडील चहाची अवीट गोडी आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारा असा हा निर्मळ मनाचा माणूस. ‘झाले बहू, होतील बहू, परंतु या सम हा.’ घरगुती किंवा सामाजिक अडचणी सोडविण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. दुसऱ्याचे दु:ख, वेदना दूर करण्यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असे. म्हणूनच ‘कृपासिंधू भाऊ, वात्सल्यसिंधू भाऊ’ असे म्हणावेसे वाटते.
डॉ. भाऊकाका हे आमचे फॅमिली डॉक्टर. आमच्याकडे कुणी तरी आजारी आहे असे कळल्यावर ते त्वरित हजर व्हायचे. त्यांनी आम्हाला दिलेली वैद्यकीय सेवा आमच्या अखंड स्मरणात राहील. त्या संदर्भातील एक प्रसंग मला नमूद करावासा वाटतो. सुमारे २५ वर्षांपूर्वी आमच्या आईला दम्याचा त्रास सुरू झाला, दम्याचा अॅटॅक आला होता. अनेक औषधे, इंजेक्शन देऊनही दमा कमी होत नव्हता. त्या वेळी आमची मानसिक स्थिती ढासळली होती. तेव्हा डॉ. भाऊकाका म्हणाले, ‘अरे, मी तुमची वेदना जाणतो. मीही तुमच्यापैकीच एक आहे. माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नात डॉ. भाऊ जोशी कधीही कमी पडणार नाही. श्री. गजानन भिडे व आम्ही वेगळे नसून एकच आहोत. काही चिंता करू नका, सर्व ठीक होईल.’ भाऊकाकांच्या प्रयत्नांना यश येऊन आईचा त्रास कमी झाला. भाऊकाकांना पेशंटविषयी किती जिव्हाळा, आत्मीयता होती, हेच दिसून येते. त्यांनी आम्हाला दिलेला धीर मी कधीही विसरू शकत नाही. भाऊकाकांवर आम्हा सर्वांचीच नितांत श्रद्धा होती, आदर होता, प्रेम, जिव्हाळा, माया, ममता होती.
काळ पुढे जात आहे. परंतु मन मात्र भाऊकाकांच्या आठवणींच्या हिंदोळ्यांनी मागे-मागे सरकत आहे. भाऊकाका हे स्वच्छतेचे पुजारी होते. संत गाडगेबाबांचे जणू सेवकच. ते नित्यनेमाने आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करीत असत. एवढेच नव्हे, तर घरासमोरील रस्ताही झाडायला ते कधी विसरले नाहीत. त्यांची श्रमप्रतिष्ठा तरुणांनाही लाजवेल अशी होती.
‘वातविकाराचे डॉक्टर’ म्हणून भाऊकाकांनी प्रसिद्धी मिळवली. गावोगावचे अनेक पेशंट वाताविकारावरील औषधासाठी त्यांच्याकडे येत असत. कोल्हापूर-मुंबईसारख्या शहरातील पेशंटही त्यांच्याकडे येऊन उपचार घेत असत. हजारो रुपये खर्च करूनही जो वातविकार बरा झाला नाही, तो भाऊकाकांच्या लघुवात, समीरपन्नग आणि इतर औषधांनी पूर्ण बरा झाल्याचे आम्ही पाहिले आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावरील हास्य हीच त्यांची संपत्ती होती.
जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केली. भाऊकाका हे तळागाळापर्यंत पोहोचलेले डॉक्टर होते. त्या संदर्भातील एक आठवण सांगणे गरजेचे वाटते. आमच्याकडे कामाला येणारी (कै.) सावित्री आजी एकदा म्हणाली, ‘आमचो आपलो पयलेपास भाऊ. गरिबांचो डॉक्टर. आमी त्येच्याशिवाय कुणाकडे जात नाय. देवमानूस आहे बिचारा. अगदी भरपूर म्हातारा होऊ दे.’ हे सांगताना तिच्या डोळ्यांतील अश्रू जणू भाऊकाकांच्या महानतेची साक्षच देत होते. भाऊकाका हे खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचे कैवारी होते.
भाऊकाकांना जीवनात अनेक संकटांना, कसोटीच्या क्षणांना सामोरे जावे लागले. ‘लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।’ परमेश्वराची कृपा व हितचिंतकांचे साह्य यांच्या जोरावर भाऊकाकांनी या संकटांवरही लीलया मात केली.
आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आवडत्या खाद्यपदार्थांची मागणी ते आवर्जून करीत. आमचे शेजारी रमाकांत लिंगायत यांच्या आईने म्हणजेच मामीने दिलेले पेरू त्यांना खूप आवडत. तसेच शेवडेमामा यांच्याकडील निरश्या दुधाच्या चहाचा ते आस्वाद घेत असत. (कै.) गंगावहिनी दाते यांच्याकडील भाजलेले शेंगदाणे व आमचे शिक्षक (कै.) जनार्दन उर्फ बापूकाका दाते यांच्याकडील दडपे पोहे, थालिपीठ व काजूगर भाऊकाकांना प्रिय होते. त्यांच्या वागण्यात कोणतीही औपचारिकता नव्हती.
गेली दोन-तीन वर्षे वगळता शेवटच्या क्षणांपर्यंत ते वैद्यकीय सेवा अखंडपणे करीतच राहिले. ‘जो टायर्ड नहीं वह रिटायर्ड कैसे हो सकता है?’ हे वाक्य त्यांच्या बाबतीत अगदी खरे ठरले. गेली ६० वर्षे भाऊकाकांनी समस्त आडिवरेवासीयांच्या मनावर अधिराज्य केले. आज ते वैद्यकीय सेवेत असते, तर त्यांनी करोनावरील औषध शोधले असते. तसेच पेशंटला मानसिक बळ देऊन करोनावर मात करण्याची शक्ती दिली असती, असे मला वाटते.
भाऊकाकांनी नाटक व दशावतार कलेला प्रोत्साहन दिले. त्यांचे चिरंजीव किरण जोशी यांनी आडिवऱ्यात झालेल्या प्रसिद्ध नाटकातून प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात काम करीत नसले तरी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. भाऊकाकांचे पुतणे डॉ. अरुण व डॉ. सौ. छाया जोशी हे दोघेही राजापूर येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांची पुढची पिढी मधुर व मकरंद व त्यांच्या पत्नीही याच क्षेत्रात कार्यरत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करीत आहेत. भाऊकाकांचे पुतणे श्री. सुधीर जोशी हे आडिवरे हायस्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष असून, हायस्कूलच्या विकासासाठी निरपेक्ष वृत्तीने अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. भाऊकाकांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा पुढे चालवीत आहेत. संपूर्ण जोशी कुटुंबीयांनीच सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
डॉक्टरांचे ऋण हे फेडता येण्यासारखे नाहीत. परंतु त्याचा थोडासा प्रयत्न आमच्या वडिलांनी म्हणजेच भिडे गुरुजींनी केला. दर वर्षी धन्वंतरी जयंतीला ते भाऊकाकांकडे जात व त्यांना फूल ना फुलाची पाकळी भेट म्हणून देत. त्यांची भेटही भाऊकाका प्रेमाने स्वीकारीत असत.
गेली दोन-तीन वर्षे ते आजारपणाने त्रस्त होते. शारीरिक भोग भोगत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या सर्वांनी त्यांची खूप काळजी घेतली. त्यांच्यावर जिवापाड प्रेम केले. १५ जुलैपासून त्यांचे आजारपण वाढत गेले. उपचारांना प्रतिसाद मिळेनासा झाला. अखेर १६ जुलै २०२० रोजी साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शब्द नि:शब्द झाले, वेळ क्षणभर थांबली, सूर्यप्रकाश असूनही काळोखाचा आभास निर्माण झाला. वातावरणात जीवघेणी खिन्नता भरून राहिली. भाऊकाका स्वर्गवासी झाले. अनंतात विलीन झाले ही बातमी सहन करणेच कठीण झाले, मन उदास झाले. भाऊकाकांच्या जाण्याने आडिवऱ्याचे वैभव गेले. खुमासदार भाषेतला इतिहास लुप्त झाला. असे डॉक्टर पुन्हा होणे नाही. त्यांचा जीवनपट सांगायचा असेल, तर स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. त्यांच्या अंत्यविधीला मला उपस्थित राहता आले नाही याबद्दल खंत वाटते.
‘फिरुनी नवे जन्मेन मी’ या उक्तीप्रमाणे समस्त आडिवरेवासीय परमेश्वुराला साद घालत आहेत, की ‘हे परमेश्वरा, आमचे धन्वंतरीचे दूत आम्हाला परत दे. नव्या रूपात दिलेस तरी चालेल. त्यांच्या मायेची ऊब आम्हाला मिळू दे. त्यांच्या प्रेमाची चादर आम्हाला पांघरू दे. करशील ना ही आमची विनवणी मान्य?’
जोपर्यंत या अनंतात, अवकाशात सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत समस्त आडिवरेवासीय भाऊकाकांचे गुणगान गात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.
- रविकिरण गजानन भिडे
मु. नवेदर, पोस्ट आडिवरे,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी.
संपर्क : ९८५०७८४१८२, ९४२११४१४७०

One comment