
रत्नागिरी : ‘करोना’च्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या असल्या, तरी संगणकीय साधनांच्या माध्यमातून व्याख्यान, परिसंवाद असे कार्यक्रम हा प्रभावी पर्याय त्यावर निघाला आहे. ‘फेसबुक’वरून दिलेल्या अशाच एका व्याख्यानातून लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांच्या रत्नागिरी येथील वास्तव्याची मनोवेधक माहिती घेण्याची संधी मराठी श्रोत्यांना मिळाली.
पत्रकार व प्रशिक्षक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे हे फेसबुकवरील व्याख्यान लोकमान्य टिळक स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झाले. दादर येथील स्वा. सावरकर सदनातर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरीत जन्मलेल्या लोकमान्य टिळकांचे बालपण आणि राजकारणात सहभागी न होण्याच्या अटीवर मुक्त झाल्यावर रत्नागिरी शहरात केलेल्या वास्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या सामाजिक सुधारणेच्या कार्याचा मनोवेधक आढावा मसुरकर यांनी व्याख्यानातून घेतला. पुढे लोकमान्य म्हणून जगविख्यात झालेल्या बाळ गंगाधर टिळकांच्या बालपणीच्या खोड्या, बुद्धिमत्तेची चुणूक दाखविणारे प्रसंग, त्यांना शिस्त लावण्यासाठी वडिलांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यांची माहिती त्यांनी दिली. टिळक आणि सावरकरांनी वास्तव्य केलेल्या रत्नागिरीतील घरांची छायाचित्रेही त्यांनी दाखविली.
सावरकरांनी रत्नागिरीस असताना लिहिलेली पुस्तके, लेख, अस्पृश्यता निवारणासाठी केलेले प्रयत्न, त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मोलाचे योगदान, श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी केलेली पतितपावन मंदिराची उभारणी, सहभोजन यांबद्दल मसुरकर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. येथील वास्तव्यात सावरकरांची भेट महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी घेतली होती, आणखी अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्यांना भेटून गेल्या, त्याबद्दलही मसुरकर यांनी माहितीपूर्ण तपशील सांगितला.
सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष राजेंद्र वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे तांत्रिक व्यवस्थापन कपिल चव्हाण यांनी केले. संगणकीय माध्यमामुळे व्याख्यानाला दूरदूरच्या श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला. (हे व्याख्यान पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.)