गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत पाच ऑगस्टपासून एसटीचे बुकिंग; प्रवासाचे नियम जाहीर

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबईतून कोकणात येणाऱ्या एसटी गाड्यांमधून चाकरमान्यांना येत्या १२ ऑगस्टपर्यंत कोकणात येता येणार असून, त्यांना कोणत्याही पासची गरज नाही. तसेच त्यांचा कोकणातील क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवसांचा असेल, असे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज मुंबईत स्पष्ट केले. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात येणे शक्य होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी मिळणार किंवा नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता होती. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली आहे; मात्र त्यासाठी काही नियम घालण्यात आले असून, त्यांचे पालन करूनच जावे यावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री परब यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवसांचा असेल.

सात हजार एसटी गाड्यांचे नियोजन त्यासाठी करण्यात आले आहे. बुकिंगप्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. चार ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिकिट बुकिंग सुरू झाले. रत्नागिरी एसटी विभागात एसटीचे बुकिंग पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एका एसटी बसमधून २२ लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून प्रवासी थेट गावात येतील. गाड्या मध्ये कुठेही थांबणार नाहीत. प्रवाशांनी स्वत:चे जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एसटी थांबणार नाही. बस फक्त दोन ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी थांबणार आहे.

खासगी बसचालकांना एसटीपेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. कोकणवासीयांना येत्या १२ ऑगस्टपूर्वी कोकणात पोहोचावे लागेल. त्यांना पुढचे दहा दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागेल. ज्यांना १२ तारखेनंतर मुंबईतून यायचे असेल, त्यांना मुंबईतून निघण्यापूर्वी ४८ तास करोनाविषयक चाचणी करावी करावी लागेल. ती निगेटिव्ह आली, तरच त्यांना कोकणात येता येईल.

चाकरमान्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य महाराष्ट्र शासनाने कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एसटी वाहनाने प्रवास करताना पासची गरज नसल्याचे सांगितले असून, खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या साऱ्यांची पोर्टलमध्ये नोंद होणार असल्याने प्रवाशांची सर्व माहिती एसटीकडे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे त्यांना ई-पासची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

शासनाने खासगी गाड्यांना याआधी ई-पास अनिवार्य असल्याचे सांगितले होते. परंतु ऑनलाइन अर्ज करूनही ई-पास वेळेवर मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. यामुळे यात आता बनावट ई-पासचीदेखील भर पडली आहे. काही खासगी वाहतूकदारांकडून बनावट पासचा वापर होत असल्याच्या घटना घडत आहेत. आज कशेडी घाटात पास नसलेल्या काही गाड्यांना परत पाठवण्यात आले. याशिवाय कोकणातील सरपंच संघटनेने क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांपेक्षा कमी करण्यास विरोध केला होता; मात्र राज्य शासनाने केंद्राच्या धोरणाप्रमाणे क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांचा केला असल्याने सरपंच संघटना कोणती भूमिका घेणार आणि कशा प्रकारे सहकार्य करणार, असे मुद्दे आता उपस्थित होणार आहेत.

नारायण राणे यांची वेगळी मागणी
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाइनची, तसेच ई-पासची अट काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने एसटी सोडण्याचा व चाकरमान्यांना दहा दिवसांचा क्वारंटाइन करण्याचा निर्णय आज जाहीर केल्याने आता या निर्णयाविरोधात राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की शासनाने चाकरमान्यांसाठी दहा दिवसांची क्वारंटाइनची अट घातली आहे. वास्तविक चाकरमान्यांना एक दिवसही क्वारंटाइन ठेवू नये. तसेच सर्वांसाठी ई-पासची अट काढून टाकावी. कोकणासाठी नको त्या अटी-शर्ती लादू नयेत. या अटी काढून टाकाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply