रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.
राज्यातील मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून कोकणासह मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि उपनगरांत होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुंबईत आज दुपारपर्यंत रेल्वेची लोकल वाहतूक आणि बेस्टची बस वाहतूक काही बंद ठेवण्यात आली होती. येत्या २४ तासांत आणखी जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठीदेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार ऑगस्ट) सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ९२.७१ मिमी पावसाची नोंद झाली. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक १४२.३० मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे; मात्र आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.
खेडमध्ये जगबुडी, चिपळूणला वाशिष्ठी, लांजा-रत्नागिरीत काजळी, तर राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. (वरील फोटो आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत काजळी नदीला आलेला पूर दर्शवतो.) रत्नागिरी शहरात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून, याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. अनेक भागांत विजेच्या तारा तुटल्यामुळे रत्नागिरी शहरात सकाळपासूनच काही भागात विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. शहरातील अभ्युदयनगरात दुरुस्तीचे काम चालू होते. शहरात तसेच ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, तर अनेक ठिकाणी विद्युतप्रवाह ट्रिप होत आहे. महावितरणकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आहे; पण सध्या पावसाचाही जोर कायम आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सकाळी दहा वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती अशी – चिपळूण तालुक्यात मौजे मुंढे तर्फे चिपळूण येथे रामदास नारायण मोडक यांच्या घरावर झाड पडल्यामुळे अंशत: नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात मौजे आदमपूर कर्ले येथील रस्त्यावर झाड पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्याचे काम सुरू होते. राजापूर तालुक्यात डोंगरगाववाडी येथे भिकाजी तांबे यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे.
चिपळूण शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरात वाशिष्ठी आणि शीव नद्यांचे पाणी भरायला सुरुवात झाली आहे. चिपळूणच्या जुन्या बाजार पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी कोणत्याही मदतीकरिता नगरपालिकेच्य चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये फोन करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या जोराबरोबर वाढणाऱ्या पुराच्या पाण्याने दुपारीच जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढील भागापर्यंत धडक दिली. मुसळधार पावसामुळे राजापूरचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच पुराचे पाणी शहरात भरू लागल्याने बाजारपेठेतील दुकानांमधील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यामध्ये व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या वर्षीही आजच्याच दिवशी शहरात पूर आला होता. त्याची आठवण नागरिकांना झाली. काल रात्रभर पावसाची रिपरीप सुरू होती. आज सकाळपासून पावसाने आणखी जोर धरला. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. काही तासांतच पुराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये धडक देताना बाजारपेठेला वेढा घातला. त्यामध्ये कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथावरील टपऱ्या, दुकाने, कोंढेतड आणि वैशपायंन पूल, बंदर धक्का आणि वरचीपेठ परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी वाढण्याचा अंदाज आणि अनुभवामुळे व्यापारी आधीच सतर्क झाले होते. पूरस्थितीचा अंदाज घेऊन काहींनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला. मात्र काहींचा माल तसाच दुकानात होता. त्यांची माल हलविताना चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र सतर्कततेमुळे व्यापाऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.
पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. अर्जुना-कोदवली नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, उन्हाळे आदी गावांमधील भातशेती पाण्याखाली गेली.
खेड तालुक्यात जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. या दोन्ही नद्यांची धोक्याची पातळी सात मीटर इतकी आहे. आज सकाळी साडेआठ वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५० मीटर, तर तर सकाळी दहा वाजता ७.७५ मीटरपर्यंत पोहचली होती. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यामुळे खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनीअरिंगनजीक रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
दापोली आणि मंडणगडकडे जाणारी वाहतूक शिवतर मार्गे क्षेत्रपालनगर-कुंभारवाडा मार्गे वळविण्यात आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने खेडच्या बाजारपेठेतील वर्दळीवर परिणाम झाला. नारिंगी नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. त्यामुळे नदीलगतच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे खाडीपट्ट्याकडे जाणारा मार्ग काही काळ बंद होता.