रत्नागिरी : आज (ता. ४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ६० रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १९९२ झाली आहे, तर याच काळात तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६६ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ४२० झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज रत्नागिरीत २०, कामथे २८, कळंबणी २, गुहागर ६, दापोली २, तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये दोघांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आज ३१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय ६, समाजकल्याण भवनातील ९ आणि केकेव्ही, दापोली येथील १६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३३५ झाली आहे.
कोकणनगर, रत्नागिरी येथील ६५ वर्षीय, राजापूर येथील ५८ वर्षीय आणि हर्णै (दापोली) येथील ६७ वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६६ झाली आहे. मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी १६, खेड ६, गुहागर २, दापोली १४, चिपळूण १३, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ५, मंडणगड १. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९१ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४२० झाली आहे. आजपर्यंत एकूण ३०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १२, सावंतवाडी तालुक्यातील २ आणि वेंगुर्ला तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सर्व प्रवासी नागरिकांसाठी १४ दिवसांचे अलगीकरण बंधनकारक राहणार आहे. तसेच सर्व तपासणी नाक्यांवर आवश्यकतेनुसार स्रावनमुने घेण्याची कार्यवाही सुरू आहे. करोनाच्या चाचणी अहवालाच्या माहितीकरिता सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत 02362229040 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
