सिंधुदुर्गातील शेतकऱ्याने विकसित केली लाल भेंडी

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील अनंत प्रभू-आजगांवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने लाल भेंडी ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवरील चाचणी प्रयोग होऊन त्याचे संपूर्ण अधिकार प्रभू-आजगांवकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शासनाने याची दखल घेऊन या भेंडी जातीच्या स्वामित्वाचे नोंदणी प्रमाणपत्र त्यांना दिले. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात प्रभू-आजगांवकर यांना सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी एन. सावंत यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व नवी दिल्लीतील वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील शेतकऱ्यांनी जतन केलेल्या गळीतधान्य, कडधान्य व भाजीपाला पिकातील जातींची नोंदणी करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कामकाज प्रकल्पप्रमुख डॉ. विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या पीकजातींचे बियाणे गोळा केले जाते. विद्यापीठ स्तरावर दोन वर्षे त्या जातीचे शुद्धीकरण व बीजवृद्धी केली जाते. संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूहाच्या नावाने नोंदणी अर्ज भरला जातो. अर्जामध्ये पीकजातीच्या गुणधर्माची संपूर्ण माहिती दिलेली असते. शेतकरी किंवा शेतकरी समूह यांच्याकडून पीकजातीच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. जातीची नोंदणी वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडे (नवी दिल्ली) झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. झाडे व वेली यांना १८ वर्षांसाठी व बियाणे कायद्यातील इतर वनस्पतींना १५ वर्षांसाठी या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होते.

प्रभू-आजगांवकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडीचे चाचणी प्रयोग होऊन त्याचे अधिकार प्रभू-आजगांवकर यांना देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमध्ये त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पी. एम. हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, प्रकल्पप्रमुख डॉ. व्ही. व्ही. दळवी आणि सहप्रकल्प प्रमुख डॉ. आर. जी. खांडेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

स्वामित्व नोंदणी प्रमाणपत्र त्यांना वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात डॉ. सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी त्यांनी लाल भेंडीची जात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त केला. विद्यापीठाच्या अतिरत मार्गदर्शनामुळेच आपण भेंडीची ही जात विकसित करू शकलो असून, यापुढेही असे काम चालू ठेवणार असल्याचे प्रभू-आजगांवकर यांनी सांगितले.

प्रास्ताविकपर मार्गदर्शनात डॉ. विजयकुमार देसाई यांनी लाल भेंडीची माहिती दिली. लाल भेंडी जातीची लागवड खरीपामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात व उन्हाळ्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करावी. ही जात प्रतिकूल तापमान सहन करू शकते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा असून काढणी सुरू व्हायला ४०-५० दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून, लांबी सात ते आठ इंच व उत्पन्न एक ते दीड किलो प्रति झाड आहे. या जातीची लागवड जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. या जातीची भेंडी पौष्टिक असून, शिजवल्यानंतर कमी चिकट असल्यामुळे बाजारात जास्त मागणी आहे.
संपर्क : प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ला (०२३६६) २६२२३४

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply