रत्नागिरी जिल्ह्यात ५२ नवे करोना रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १३७१ करोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून, बरे होण्याचे हे प्रमाण ६८ टक्के आहे. आज (सहा ऑगस्ट) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळले. तसेच, आज (सहा ऑगस्ट) रात्री १०.३० वाजता हाती आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ४८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालपासून ५२ रुग्णांची भर पडली असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०६४ झाली आहे.

आज बरे झालेल्या १४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये माटे हॉल, चिपळूण येथील ९, समाजकल्याण भवन, रत्नागिरीतील ३ आणि देवधे, लांजा येथील दोघांचा समावेश आहे. आज सायंकाळपर्यंत आढळलेल्या नव्या चौघा रुग्णांपैकी एक रत्नागिरीचा, तर तिघे राजापूरचे आहेत. आज रात्री आढळलेल्या नव्या ४८ रुग्णांमध्ये रत्नागिरीतील १४, कामथे येथील १०, कळंबणीतील १९, दापोलीतील दोन आणि देवरुखातील एका रुग्णाचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत दोघे जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान, रत्नागिरीतील तारा ऑर्किडमधील ६६ वर्षीय रुग्ण (बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे) आणि गोळप येथील ६८ वर्षीय करोना रुग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६८ झाली आहे. तालुकानिहाय मृतांची आकडेवारी अशी – रत्नागिरी १८, खेड ६, गुहागर २, दापोली १४, चिपळूण १३, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ५, मंडणगड १.

आज एकतानगर, कोळंबे, साई भूमीनगर, शिरगाव, पारस ओसीअन व्ह्यू अपार्टमेंट, थिबा पॅलेस, शासकीय वसाहत, आरोग्यमंदिर, आंबेशेत, कुर्टेवाडी, उत्कर्षनगर, कुवारबाव, विठ्ठल मंदिरामागे, कुवारबाव, प्रतिभा महिला वसतिगृह, रत्नागिरी, संभाजीनगर, नाचणे, तारा ऑर्किड, माळनाका, सैतवडे चिंचबंदर, मेंटल हॉस्पिटल ही क्षेत्रे करोनाबाधित म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७७ आहे. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या १२७ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय ४९, समाजकल्याण भवन ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ३४, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी ११, कोव्हिड केअर सेंटर, घरडा १, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ३, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २१, गुहागर १, संगमेश्वर १.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची आजअखेरची संख्या २९ हजार ७०७ आहे.

रत्नागिरीतील आरोग्य स्थितीचा उदय सामंत यांच्याकडून आढावा
रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाविषयक स्थितीचा आढावा मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला. ते म्हणाले, की जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे २७ डॉक्टरांची यादी जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करण्यात आली आहे. त्यातून डॉक्टर उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही पक्षाच्या लोकांनी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणे योग्य नाही. डॉक्टर मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असलेल्या डॉक्टरांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. डॉक्टर येथे कसे टिकतील, यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. कामथे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचे मन वळविण्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि आपण प्रयत्न करणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. आरोग्यविषयक सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांशी उद्या (सहा ऑगस्टला) ऑनलाइन संवाद साधला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply