गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली; १० दिवस क्वारंटाइन

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम तयार करण्यात आले असून, त्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (सहा ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

उदय सामंत यांनी सांगितले, मुंबईहून येणाऱ्यांसाठी क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवसांचा असेल. त्याबाबतची नियमावली सर्वांना दिली जाणार आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यात येणाऱ्या एसटी गाड्या लोणेरे, म्हाप्रळमार्गे येतील, तर जिल्ह्यातील इतर गाड्या कशेडी घाटातून येणार आहेत. प्रत्येक प्रवाशाची माहिती तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य, महसूल आणि पोलीस खात्याच्या संयुक्त पथकापर्यंत पोहोचवली जाईल. मुंबईहून येणाऱ्या गाड्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणापर्यंत या पथकाकडे पोहोचतील. तेथे प्रत्येक चाकरमान्याची रॅपिड टेस्टिंगद्वारे चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याच्या विलगीकरणाबाबतचा निर्णय वैद्यकीय अधिकार घेतील. महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. मुंबईतून येणाऱ्या या चाकरमान्यांना एसटीची गाडी हाच पास असेल. त्यांना इतर कोणत्याही पासची गरज राहणार नाही. प्रवाशांचे प्रवासातील खाणे-पिणे, स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. गावात पोहोचल्यानंतर नागरी कृती दल आणि ग्राम कृती दलामार्फत त्यांची व्यवस्था केली जाईल. या दलांना येत्या शनिवार-रविवारी मार्गदर्शन केले जाणार आहे.

खासगी गाड्यांना पास आवश्यक
कोकणात येणाऱ्या खासगी गाड्यांना पास आवश्यक आहे, असे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, की खासगी बसमधून चाकरमान्यांना कोकणात आणणाऱ्यांना एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट आकारण्याची नियमानुसार परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास मोटार वाहन नियमानुसार, तसेच पोलिसांमार्फत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल. मुंबईतून एसटी जेथून सुटणार आहेत तेथील अधिकारी, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस यांचा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply