रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आज (पाच ऑगस्ट) सकाळीच निधन झालेले बालरोगतज्ज्ञ दिलीप प्रभाकर मोरे यांच्या नावाने जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर मोरे यांचे आज पहाटे करोनामुळे निधन झाले. त्याबद्दल शोक व्यक्त करताना सामंत म्हणाले, की डॉ. मोरे म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा कणा होता. राज्यात प्रथमच सहा महिन्यांचे करोनाबाधित बाळ डॉ. मोरे यांच्या प्रयत्नामुळे वाचले होते. ज्या करोनाविरुद्ध ते लढले, त्याच आजाराने ते गेले हे दुर्दैव आहे. त्यांचे कार्य जिल्हा रुग्णालयात यापुढे येणाऱ्या आणि सध्या असलेल्या डॉक्टरांसमोर दीपस्तंभाप्रमाणे राहावे, यासाठी रुग्णालयातील एका कक्षाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात अनेक कटू प्रसंग निर्माण झाले; पण अशा प्रसंगात बाहेरून येणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांना मानसिक पाठबळ देण्याचे काम डॉ. मोरे यांनी केले होते. त्यामुळेच प्रत्येक डॉक्टरने रुग्णांशी बांधिलकी जपताना त्यांचा आदर्श समोर ठेवावा, अशी त्यांच्या नावे कक्ष सुरू करण्यामागची कल्पना आहे, असे सामंत यांनी सांगितले.
