रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ प्रमोद ऊर्फ रघुवीर भिडे आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे या दोघांच्या अवघ्या अकरा दिवसांत झालेल्या निधनामुळे दोन वेगवेगळ्या शाखांमधील वैद्यकीय शाखांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दोघेही करोनाच्या आजाराने निधन पावले, हा एक दुर्दैवी योगायोग. वैद्य भिडे यांचे करोनाविषयीचे आयुर्वेद शास्त्रानुसार संशोधन सुरू होते, तर डॉक्टर मोरे यांनी करोनाबाधित ४४ बालकांना करोनाच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन प्राप्त करून दिले होते. या दोघांचाही दुर्दैवी अंत करणाऱ्या आजारामुळे आरोग्य यंत्रणा आणि ती चालविणारी शासन यंत्रणा याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात.
रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात प्रदीर्घ काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेले डॉ. दिलीप मोरे यांच्या आठवणी जपण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील एका कक्षाला त्यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली; पण केवळ नाव देऊन प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडविण्यासाठी खूप काही करावे लागणार आहे. करोनाच्या जगद्व्यापी आजारावर अजून औषध सापडलेले नाही. त्यामुळे करोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे यापलीकडे तूर्त तरी कोणतेच उपाय नाहीत. कित्येक लहान बालकांवर उपचार करणारे डॉ. मोरे जिल्हा रुग्णालयातील इतर डॉक्टरांचे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांनाच करोनासाठी दाखल केल्यानंतर जेवढे शक्य होते, तेवढे उपचार त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असणार, यात शंका नाही; पण तरीही ते डॉक्टरांचा जीव वाचवू शकले नाहीत. याचा अर्थ यंत्रणा कमी पडली आहे. यंत्रणेत काही दोष आहेत का, आणखी काही उपकरणे आणि साधनसामग्री हवी आहे का, हेही तपासायला हवे. डॉक्टरांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करणार असल्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले; पण केवळ चौकशी करून हे प्रश्न सुटणार नाहीत. तुटपुंजी साधने, अपुरे कर्मचारी, राजकीय दबाव सहन करत आरोग्य यंत्रणा काम करत आहे; पण त्यांना पुरेशी साधने दिली जात नसतील तर त्यांचे प्रयत्न तोकडे पडणार, यात शंकाच नाही. ती यंत्रणा चालविणारे शासन या साऱ्यात कमी पडत आहे, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा नव्हे, तर आरोग्य यंत्रणा चालविणाऱ्यांविषयी प्रश्नचिन्ह आहे.
रत्नागिरीतील एका ज्येष्ठ नागरिकाने स्पष्टपणे सांगितले, की रत्नागिरीत आजारी पडणेही आता कठीण झाले आहे. इतर आजारांचे जाऊ द्या, पण साध्या सर्दी-पडशाच्या आजारासाठी कोणताही डॉक्टर आपली सेवा देत नाही. कारण त्यांच्या मनातही भीती आहे. त्यामुळे कोणी रुग्ण त्यांच्याकडे गेला, तर तो करोनाचाच रुग्ण असला पाहिजे, असे मानून त्याला शासकीय दवाखान्यात पाठविले जाते. सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होते, ते डॉक्टरांचाच बळी गेल्यामुळे दिसतेच आहे. अशा स्थितीत रत्नागिरीत राहणे सुखाचे नाही. म्हणून डॉक्टर असलेली कन्या आणि जावयाकडे आपण जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोघा वैद्यकीय तज्ज्ञांचा करोनामुळे बळी जातो, हे लक्षात घेतल्यानंतर लोकांच्या मनात हा अविश्वास निर्माण झाला आहे. तो अविश्वास दूर करण्याची मानसिकता मुळातच राज्यकर्त्यांमध्ये नाही.
आणखी एका बाबीकडे लक्ष वेधावेसे वाटते. डॉ. मोरे यांच्याप्रमाणेच वैद्य रघुवीर भिडेही रत्नागिरी पालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना कित्येक वर्षे सांभाळत होते. डॉ. मोरे यांच्याप्रमाणेच भिडे यांच्या आठवणीही नगरपालिकेला जाग्या ठेवण्यासाठी काही करता आले असते; मात्र पालिकेचे आयुर्वेदिक दवाखाने बंद पडले आहेत. त्यामुळे पालिका त्यासाठी काहीही करू शकणार नाही. त्याहून काही वेगळे करावे, अशी कल्पना पालिकेतील पदाधिकाऱ्यांना सुचण्याची शक्यता नाही.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ७ ऑगस्ट २०२०)
(सात ऑगस्टचा अंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
योग्य आणि परखड