रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे यंदाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२० सालचे विविध पुरस्कार आज (११ ऑगस्ट) जाहीर केले. कोणतेही अर्ज न मागवता विविध माध्यमांतून माहिती मिळवून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पत्रकार अरुण आठल्ये, डॉ. बाळकृष्ण पाध्ये, कीर्तनकार अनंत कर्वे, उद्योजक विनायक वाकणकर, वेदमूर्ती सुयोग पाध्ये आणि शिक्षिका सौ. अनघा प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस समारंभपूर्वक पुरस्कार दिले जातात; मात्र यंदा करोना महामारीमुळे पुरस्कारांचे वितरण कधी करण्यात येईल, याबाबत अद्याप तारखा ठरवण्यात आलेल्या नाहीत. त्याची माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे.

बाळकृष्ण दत्तात्रय पाध्ये यांना धन्वंतरी पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांनी सुरुवातीला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्री-डिग्री, इंटर सायन्सचे शिक्षण घेऊन टिळक आयुर्वेद कॉलेजमधून बीएएम अँड एस ही वैद्यकशास्त्राची पदवी संपादन केली. मातृमंदिर देवरुख आणि शिपोशी येथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. १९७२पासून ते राजापूर येथे व्यवसाय करत आहेत. राजापूर एसटी डेपो, एलआयसीचे अधिकृत वैद्यकीय अधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक, राजापूर नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष, राजापूर संस्कृत पाठशालोत्तेकजक निधी संस्थेत विश्‍वस्त, शिवस्मृती मंडळ संस्थापक अध्यक्ष, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सल्लागार अशा विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

खानू-मठ येथील निवृत्त सैनिक आणि मुक्त पत्रकार अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार जाहीर झाला. ७२ वर्षीय आठल्ये यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. नंतर इराणच्या शिपिंग कंपनीत इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून काम केले. तसेच खानू गावाचे सरपंचपदही पाच वर्षे भूषवले. अनेक वर्षे ते मुक्त पत्रकार म्हणून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करत आहेत.

कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार देण्यात येणार आहे. भजनी कलाकार असलेल्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला. संगीत विशारद (हार्मोनियम वादन), संगीत अलंकार असलेले कर्वे हे रसायनी येथे एचओसी स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी भूमिका केल्या, तसेच संगीत संयोजनाची जबाबदारीही निभावली. पनवेल कल्चरल सेंटरचे ते माजी अध्यक्ष आहेत. १९८४पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांनी कीर्तने केली आहेत. त्यांना उज्जैन येथे कीर्तनरत्न ही उपाधी प्राप्त झाली. तसेच नागनाथ जोशी चऱ्होलीकर स्मृती पुरस्कार व कीर्तन भूषण ही पदवी त्यांना मिळालेली आहे. शृंगेरीपीठाधीश प. पू. विधुशेखर भारती तीर्थस्वामी महाराजांच्या हस्ते त्यांना कीर्तनभूषण पुरस्कार मिळालेला असून, हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे कीर्तनभास्कर पदवी प्राप्त झाली आहे.

आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार ससाळे (राजापूर) येथील सौ. अनघा विश्‍वास प्रभुदेसाई यांना जाहीर झाला. सन १९८६ पासून त्यांनी पाचेरी सडा (गुहागर), बारसू, आंगले, पांगरे बुद्रुक (राजापूर) या शाळांमध्ये सलग ३४ वर्षे सेवा बजावली. गरजू विद्यार्थ्यांना मदत, शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

आदर्श पौरोहित्य पुरस्कार सुयोग मोहन पाध्ये यांना जाहीर झाला आहे. न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथून दहावी उत्तीर्ण झाल्यावर पाध्ये यांनी राजापूर संस्कृत पाठशाळा, वेदमूर्ती गणेश खेर, गणेश फाटक, गजानन फाटक यांच्याकडे विविध प्रकारचे याज्ञिक अध्ययन केले. तसेच वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी, प्रकाश साधले, सुनील भाटवडेकर, अनंत बांधेकर, हरिहर खांडेश्‍वर, बाळकृष्ण थिटे यांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभले. विविध हस्तलिखिते व जुन्या ग्रंथांचे संकलन व प्रकाशन संग्रह (भाग १-२) करून त्यांनी प्रत्येकी पाच हजार प्रतींचे वितरण केले. विशेष यज्ञांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले असून, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या आधिपत्याखाली शृंगेरी पीठामार्फत आठ अतिरुद्रांमध्ये प्रतिनिधित्व, तसेच नवकुंडात्मक नवग्रहयज्ञ केले आहे.

उद्योजक पुरस्कार विनायक केशव वाकणकर यांना दिला जाणार आहे. बीए आणि आयटीआय (मोटर मॅकनिक) झाल्यावर वाकणकर यांनी दहा वर्षे रत्नागिरी एसटी विभागात मेकॅनिक म्हणून नोकरी केली. १९९०पासून त्यांनी अन्नप्रक्रिया उत्पादन परवाना काढून अमृत कोकमच्या व्यवसायाला सुरुवात केली. एसटी वर्कशॉपमधील कामगार हेच त्यांचे सुरुवातीला ग्राहक होते. त्यांनी प्रोत्साहन दिले आणि व्यवसाय वाढवला. २००३पासून आवळ्याचे आले-लिंबू मिश्रित सरबत रत्नागिरीत प्रथमच बाजारात आणले. ते लोकांना आवडले. त्यात काही सुधारणा केल्या आणि चार वर्षांत सरबत लोकप्रिय झाले. त्यानंतर अननस, संत्री, कैरी पन्हे, लिंबू आदी फळांच्या सरबतांचे उत्पादनही त्यांनी सुरू केले. पत्नी सौ. ममता यांनी लिंबू, आंबा, मिरची लोणचे, मोरावळा करायला सुरवात केली. दोघांनीही फळप्रक्रिया प्रशिक्षण घेतले. आमरस पॅकिंग सुरू केले. गेली चार वर्षे चकली, चकली स्टिक, कडबोळी आदी उत्पादनेही त्यांनी सुरू केली. त्यांचा शीतल प्रॉडक्ट्स हा ब्रँड आता लोकप्रिय झाला आहे. त्यांचे दोन्ही मुलगेही या व्यवसायात मदत करतात.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply