ओव्या, फुगड्यांच्या गाण्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी शकुंतला शिंदे यांचे निधन

रत्नागिरी : खोरनिनको (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील जुन्या पिढीतील ओव्या, फुगड्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी श्रीमती शकुंतला दत्ताराम शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

पयली माजी ववी.. पयला माजा नेम ll
तुलसीखाली राम.. पोती वाची ll
(अर्थ – पहिली माझी ओवी.. पहिला माझा नेम.. ll)
तुळशी खाली राम.. पोथी वाची ll
दुसरी माजी ववी.. दुसरा माजा नेम ll
धनी शत्रू मारी.. झुंजुनीया ll
(अर्थ – दुसरी माझी ओवी.. दुसरा माझा नेम ll)

अशा जुन्या काळातील अनेक ओव्या आणि फुगड्यांच्या गाण्यांचा मोठा संग्रह श्रीमती शिंदे यांनी जोपासला होता. अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या तो सादर करत असत.

श्रीमती शिंदे वीरपत्नी होत्या. त्यांचे पती नाईक दत्ताराम सीताराम शिंदे भारतीय सशस्त्र सेनेत होते. चीनबरोबर १९६२ साली आणि पाकिस्तानबरोबर १९६५ साली झालेल्या दोन्ही लढायांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अनेक मानचिन्हे त्यांच्या घरी पाहावयास मिळतात. निवृत्तीनंतर त्यांनी रत्नागिरी आकाशवाणी केंद्रामध्ये सेवा केली आणि कारवांचीवाडी येथे घर बांधून तेथे स्थायिक झाले. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणारा त्यांचा धाकटा पुत्र प्रदीप यानेही भारतीय सशस्त्र सेनेत १७ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतर तो आईसोबत कारवांचीवाडी (ता. रत्नागिरी) येथे राहत असून, खासगी नोकरी करत आहे. त्याच्याच घरी त्यांचे निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा श्यामसुंदर मूळ गावी खोरनिनको येथे राहतो. गावच्या तंटामुक्ती समितीचे, तसेच खोरनिनको विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्यामसुंदर अनेक वर्षे कार्यरत आहेत.

श्रीमती शिंदे यांच्या निधनामुळे ग्रामीण बाजातील फुगड्या आणि जात्यावरील ओव्या ऐकवणाऱ्या जुन्या पिढीतील मिलिटरीवाल्याच्या शकुंतलेला आपण कायमचे मुकलो असल्याची खंत खोरनिनको येथे व्यक्त केली जात आहे.

श्रीमती शिंदे यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित कन्या, नातवंडे, पतवंडांसह मोठा परिवार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply