खासगी डॉक्टरांबाबत शासनाचे धोरण प्रतिकूल; दापोलीतील डॉक्टरचा हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय

दापोली : करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुचविलेल्या उपायांकडे, तसेच खासगी डॉक्टरांची सेवा घेताना त्यांच्या सुरक्षेकडे शासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कंटाळून जाऊन दापोलीतील डॉ. मेहेंदळे दाम्पत्याने आपले रुग्णालय एक सप्टेंबर २०२०पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत डॉ. वसंत मो. मेहेंदळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. वर्षा मेहेंदळे यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेली पोस्ट पाहून त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, ‘खासगी डॉक्टरांबाबत शासनाचे धोरण प्रतिकूल आहे. सुरुवातीच्या काळात करोनाचा धोका असला, तरी आपण योद्धे असल्याने सर्वांनी दवाखाने सुरू ठेवावेत, असे आवाहन मी माझ्या समव्यावसायिकांना केले होते. या पद्धतीने सात महिने काम केले; मात्र राज्य शासनाचे धोरण डॉक्टरांना प्रतिकूल आहे. लायसन्स काढून घेऊ, घरी बसवू असे खासगी डॉक्टरांना सांगून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. सेवा बजावताना अनेक खासगी डॉक्टर करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही दवाखाने चालवत आहोत; मात्र सरकारला आमची फिकीर नाही. वास्तविक खासगी डॉक्टरांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, की ‘डॉक्टर्स योद्धे है, उनकी सहायता करो, उनका सन्मान करो, उन्हें मदत करो. मैं डॉक्टरों को नमन करता हूँ।’ त्यांची तशी भावना आहे. आमचे आरोग्यमंत्री मात्र ठोकायला निघाले आहेत. चुकूनही त्यांनी डॉक्टरांबद्दल चांगले उद्गार काढले नाहीत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले नाही. खासगी डॉक्टरांच्या मृत्यूचे त्यांना काहीही सोयरसुतक नाही.’

‘आम्ही संशयित करोनाबाधितांना सरकारी रुग्णालयात पाठवले, तर आम्हाला त्याचा फीडबॅक दिला जात नाही. देशाचा गृहमंत्री करोबाधित होतो, मंत्री अशोकराव चव्हाण, सेलिब्रिटी अमिताभ बच्चन पॉझिटिव्ह होतात, ते सर्वत्र कळते. मग सामान्य रुग्णांची नावे जाहीर का केली जात नाहीत, हे कळत नाही. त्याची माहिती मिळाली, तर आम्ही खबरदारी घेऊ. तो रुग्ण आमच्याकडे आला, तर त्याल व्यवस्थित राहायला सांगू. नावे सांगितली जात नसल्यामुळे आलेला रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही, हे समजत नाही. अशा स्थितीत प्रादुर्भाव वाढण्याचीच शक्यता आहे. डॉक्टरांच्या मताचा विचार न करता निर्णय जाहीर केले जात आहेत. सरकारला डॉक्टरांची किंमत नाही. त्यात निधन झाले, तर हे श्रद्धांजलीसुद्धा वाहणार नाहीत. सहानुभूती नाही. साधे पत्रही नाही,’ असेही डॉ. मेहेंदळे म्हणाले.

ते म्हणाले, ‘आम्ही वयाची पासष्टी ओलांडलेले आणि स्वतःला को-मॉर्बिड आजार असलेले सीनियर मेडिकल प्रॅक्टिशनर आहोत. करोना आपत्ती आल्यानंतरही समाजहित व सामाजिक बांधिलकी ह्यासाठी मृत्यूचा धोका पत्करून रुग्णसेवा करीत आलो. आम्ही मरणाला अजिबात भीत नाही. परंतु सरकारला डॉक्टरांच्या मृत्यूचे काहीही सोयरसुतक नाही. चुकीची धोरणे राबवली जात आहेत. त्यामुळे स्वतःहून आगीत उडी घेणे योग्य नाही. आम्ही सरकारच्या धोरणात सुधारणा व्हावी, म्हणून वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांद्वारे प्रयत्न केले; पण दखल घेतली गेली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री आणि अन्य नेत्यांना विनंतीवजा रजिस्टर्ड सूचनापत्रे पाठवली. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. करोनायोद्ध्यांचा सन्मान ठेवा, त्यांना साह्य करा, अशा कॉलर ट्यून्स चालू असतात. प्रत्यक्षात सरकार डॉक्टरांच्या हिताचा व जिवाचा विचार करायला तयार नाही.’

‘करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या परिस्थितीचा विचार करून आम्ही येत्या एक सप्टेंबरपासून आमचे दापोलीचे मेहेंदळे रुग्णालय जनरल, सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल स्वतःहून बंद करीत आहोत. गेली ४२ वर्षे रुग्णांनी व नागरिकानी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत,’ असेही डॉ. मेहेंदळे यांनी व्यथित मनाने सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply