वसई : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या १५ ऑगस्टपासून विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. त्या येत्या ५ सप्टेंबरपर्यंत जाणार आहेत. या गाड्यांना सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला तरी चाकरमान्यांनी नंतर मात्र चांगला प्रतिसाद दिला आहे. परतीच्या प्रवासात तर अनेक गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. मुंबईतून कोकणात गेलेले चाकरमानी गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा मुंबईत येणार आहेत. कोकण रेल्वेमुळे त्यांना कमीत कमी खर्चामध्ये, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून मुंबईमध्ये परतणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतरही पुढे काही काळ या गाड्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी लोकलमधून प्रवास करण्याची मुभाही त्यांना मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक आणि सचिव यशवंत जड्यार यांच्या सहीच्या या पत्राच्या प्रती कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गुप्ता, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.