तुमची रोगप्रतिकारशक्ती किती, हे कसे समजून घ्याल?

रत्नागिरीत सुरू झाले पहिले रोगप्रतिकारशक्ती मापन केंद्र

रत्नागिरी : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या आणि वाढण्याची शक्यता असल्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा उपाय सांगितला जात आहे. ही रोगप्रतिकारशक्ती किती आहे, याचे मापन करणारे केंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. करोनाच्या काळात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

निमा या देशभरातील भारतीय चिकित्सा पद्धती अवलंबिणाऱ्या वैद्यकीय पदवीधारकांच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या शिखर संघटनेने चालविलेले हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले रोगप्रतिकारशक्ती मापन केंद्र आहे. राज्यभर अशी निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरू झाली आहेत.

कोणत्याही व्याधींपासून शरीराला लांब ठेवण्याची प्रत्येकाची एक नैसर्गिक ताकद असते, तिला प्रतिकारशक्ती म्हणतात. शेजारच्या व्यक्तीला झालेले दुखणे आपल्याला लगेच न होणे यालाच आयुर्वेदात व्याधिक्षमत्व म्हणतात. व्याधींना किंवा दुखण्यांना प्रतिकार करण्याची शरीराची असणारी स्वाभाविक ताकद म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती आहे. प्रतिकारशक्ती थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. ती आहार, विहार, व्यायाम आणि इतर योग्य सवयींनी वाढवता येते. या सर्व गोष्टी सातत्याने पाळाव्या लागतात. त्याने निश्चित फरक पडतो. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी झटपट असे काहीही उत्तर नाही. पण मिळणारे निरोगी आयुष्य मात्र दीर्घकाल टिकू शकते. सध्या सुरू असलेल्या करोनाची लस करोनाविरुद्ध क्षमत्व प्रदान करील. मात्र भविष्यकालीन अन्य रोगजंतूंच्या संक्रमणापासून त्या लशीतून संरक्षण मिळण्याची शक्यता नाही. तसा एखादा आजार आला, तर त्यावेळी पुन्हा लॉकडाउनसारखे उपाय योजावे लागू शकतील. त्यामुळे स्वाभाविक व्याधिक्षमत्व म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती हाच या सर्वांवर तोडगा आहे. खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनण्यासाठीचा तोसुद्धा एक मार्ग आहे. तो प्रत्येकापाशी आहे. त्यासाठी प्रत्येकाची रोगप्रतिकारकशक्ती तपासली जाणे आवश्यक आहे. ती तपासली गेली, तर आपले शरीर निरोगी राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. भारतीय पारंपरिक आरोग्य व्यवस्थेत रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा उपयोग समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने राज्यभर निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरू केली आहेत. त्यापैकी एक केंद्र रत्नागिरीत डॉ. अभय धुळप यांनी सुरू केले आहे.

निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून आपला स्वत:चा व्याधिक्षमत्व निर्देशांक जाणून घेता येऊ शकेल. या निर्देशांकानुसार आपल्या शरीराची सद्यःस्थिती काय आहे, ते समजून घेऊन त्यानुसार स्वाभाविक व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी काय उपायोजना करण्याची आवश्यकता आहे याविषयी तज्ज्ञ डॉक्टर समुपदेशन करतील. व्यक्तिसापेक्ष आहार, योगासने, दैनंदिन सवयी आणि जीवनमान व्यवस्थापन मार्गदर्शन केले जाईल. इम्युनिटी क्लिनिक संकल्पना आणि त्याविषयी क्षमता बांधणी प्रशिक्षण नुकतेच ऑनलाइन घेण्यात आले आहे. रत्नागिरीत डॉ. अभय धुळप यांच्या या केंद्रात इम्युनिटी स्कोअर जाणून घेता येईल. दुपारी दोन ते चार या वेळेत ०२३५२-२३४०३९ या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेता येईल. याशिवाय आपल्या जवळच्या इम्युनिटी क्लिनिकची माहिती http://www.naic.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
पुढील लिंकवर नोंदणी करा : https://bit.ly/3hJSPIY व्हॉट्सअॅपवर संपर्कासाठी https://bit.ly/2NHmTr7 येथे क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply