नवी दिल्ली : भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४) यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विटद्वारे दिले आहे. त्यांच्या फुफ्फुसाला जंतुसंसर्ग झाला होता. तसेच, १० ऑगस्टला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली होती. गेले काही दिवस ते कोमामध्ये आणि व्हेंटिलेटरवर होते.
११ डिसेंबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला. १९६९पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. ते इंदिरा गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. २००९ ते २०१२ या काळात ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. तसेच या काळात सरकारवर आलेल्या संकटांमध्ये पक्षाला योग्य दिशा दाखविण्याचे काम त्यांनी केले. २०१२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी राष्ट्रपतिपद सांभाळले होते. २०१९ मध्ये त्यांना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
