माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ३ (टोपीवाला हायस्कूलमधील गोखले सर)

श्री. गोखले सर

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेतील तिसरा लेख आहे विजय रोहिदास चौकेकर यांचा… टोपीवाला हायस्कूलमधील (मालवण, जि. सिंधुदुर्ग) शिक्षक चंद्रकांत नारायण गोखले यांच्याविषयीचा…
………
महात्मा ज्योतिबा-सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे उघडली. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही,’ असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले; मात्र काही जणांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे वाघिणीचे दूध पिताच आले नाही. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अशा व्यक्तींच्या जीवनात कुठल्या तरी घटनेमुळे अथवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेरणेमुळे यशस्वी बदल होतात. असेच माझे जीवन ज्या देवदूतांमुळे घडले, त्या देवदूताचे नाव आहे श्री. चंद्रकांत नारायण गोखले.

मी १९८१मध्ये मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये अकरावीला प्रवेश घेतला. गोखले सर आम्हाला राज्यशास्त्र शिकवत होते. सरांचा स्वभाव शांत, प्रसन्न आणि कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे सहा महिन्यांतच आमचे घरोब्यासारखे संबंध निर्माण झाले.

घरच्या गरिबीमुळे मी सहामाहीनंतर शाळा सोडली. सर बाहेरून माझी चौकशी करीत होते. सर मला मे महिन्यात मालवण बाजारात भेटले. त्यांनी मला घरी नेले. गोखले उभयतांनी माझी आस्थेने चौकशी केली. ‘घरच्या गरिबीमुळे मी शाळा सोडली असून, सध्या चिरेखाणीवर दगड काढून आई-बाबांना मदत करतो,’ असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे पुढे सर्व शैक्षणिक खर्च केलाही.

… आणि माझे पुन्हा शैक्षणिक जीवन सुरू झाले. मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयामधून मी अकरावी, बारावी पूर्ण केले. पुढे माझे ‘डीएड’ही पूर्ण झाले. मालवणचे शरद पेडणेकर यांनीही मला शैक्षणिक मदत केली.

आज गोखले सर ७५ वर्षांचे झालेत. धूसर दिसत असल्याने बाईंच्या डोळ्यातून जग पाहतात; पण ‘सर कसे आहात?’ असे विचारताच, ‘विजय ना रे?’ असे विचारतात. सर आवाजावरून ओळखतात. गुरुपौर्णिमेदिवशी मी या उभयतांचे न विसरता आशीर्वाद घेतो.

माझ्या जीवनात त्या वेळी सर देवदूतासारखे आले नसते तर, माझे जीवन कसे असते, याची मी कल्पना करतो आणि खाणकामगारांच्या वस्तीत जाऊन येतो.

गोखले उभयतांना यापुढेही निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच त्या नियंत्याजवळ हृदयापासून प्रार्थना.

 • विजय रोहिदास चौकेकर
  (उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जि. प. पू. प्रा. केंद्रशाळा आंबेरी नं. १ (ता. मालवण); ३२ वर्षे सेवा)
  पत्ता : मु. पो. चौके, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०५
  मोबाइल : ९४२०९ ७४७७५
  ई-मेल : vijay09863@gmail.com
  …..
  (उद्याचा लेख सुगंधा गुरव यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply