माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ७ (मालवणच्या भंडारी हायस्कूलमधले देऊलकर सर)

श्री. ज्ञानेश देऊलकर सर

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील सातवा लेख आहे अर्चना उमेश कोदे यांचा… मालवणधील भंडारी हायस्कूलमधील ज्ञानेश देऊलकर यांच्याविषयीचा…
………
‘माझी शाळा नि माझे शिक्षक’ म्हणताच, लाभलेल्या गुरुवर्यांच्या मांदियाळीतून, साने गुरुजींचा वारसा जोपासणाऱ्या, सौम्य, ऋषितुल्य, कार्यतत्पर, मृदू, पण तितक्याच कणखर व्यक्तिमत्त्वाचे, ज्ञानदानाची पवित्र परंपरा शतकाहूनही अधिक काळ जोपासणाऱ्या मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये मला मराठी शिकवणारे, ज्ञान, कार्य व सेवातपस्वी श्री. ज्ञानेश देऊलकर सर यांचे नाव मनात आले नाही, तर माझ्यासारखी कृतघ्न मीच म्हणावी लागेल.

माझी शिक्षिका असलेली आई, त्रिवेणी कोळंबकर बाई, केळकर बाई, मुरवणे मॅडम, भ. स. कदम, आदी गुरुवर्यांनी मराठी विषयाची उत्तम मशागत केलेल्या माझ्या मनात दहावीच्या वर्गात उत्तम बीज पेरून तरारून पीक घेतलं ते देऊलकर सरांनी.

कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’मधली जाज्ज्वल्य देशभक्ती ओजस्वीपणे आमच्या मनात सरांनी रुजवली, तर भा. रा. तांबेंच्या ‘जन पळभर म्हणतील’तील कातर भावविव्हलता मूर्तिमंत आमच्या मनात उतरवली. ‘चाफा बोलेना’तील अद्वैत त्या नकळत्या वयात कसं बरं आमच्या मनात ठसवलंत, हे अजूनही न सुटणारं कोडंच वाटतं.

प्रश्नोत्तरांच्या पलीकडे जाऊन दादा धर्माधिकारींचे ‘तारुण्याचे तीन तकार’ही तेवढ्याच तत्परतेने आमच्या मनात ठसवण्यात सर किती अन् कसे यशस्वी झाले होते, याचा प्रत्यय मला शिक्षक झाल्यावर आला. तोच पाठ मला शिकवायला लागला, तेव्हा सरांचं स्मरण झाल्याशिवाय राहिलं नाही. मला सरांसारखं शिकवता आलं की नाही माहिती नाही; पण विद्यार्थ्यांचं समरसून जाणं, उत्तर देणं, मुख्य म्हणजे जे प्रेम, जी भक्ती मी सरांवर करीत होते नि त्याचा प्रत्यय मला माझ्या विद्यार्थ्यांकडून येणं, हे सारं घडत होतं. मी त्याला सरांचा आशिषच समजत होते.

कळत-नकळत सुबोधपणे व्याकरण शिकवण्याची विलक्षण हातोटी सरांकडे होती नि म्हणूनच माझ्या दहावीनंतर आठ-१० वर्षांनी मी जेव्हा पदवीला मराठी न घेऊनही (माझे पदवीला हिंदी-भूगोल विषय होते) दहावीला मराठी, विशेषतः वृत्तासारखा विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणारा भाग शिकवायला उभी राहिले, तेव्हा सरांची सोपी पद्धत, जी त्यांनी आम्हाला शिकवताना वापरली होती, ती वापरली, अन् ‘क्लिष्ट व्याकरण सोपे करून शिकवणाऱ्या मॅडम’ या विद्यार्थ्यांनी दिलेल्या किताबाची मानकरी ठरले.

नोकरीला लागल्यापासून गेली २०-२२ वर्षे दहावी व इतर वर्गांना विद्यार्थिप्रिय शिक्षिका बनून मराठी शिकवण्याची जी जबाबदारी पार पाडतेय, ती केवळ सरांच्या शिकवण्याचा माझ्यावर जो ठसा उमटलाय त्यामुळेच.

सेवाज्येष्ठतेच्या नियमानुसार सर मुख्याध्यापकाच्या खुर्चीत जरी बसले नाहीत, तरी माझ्यासारख्या अनेकानेक विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ते अनभिषिक्त सम्राटच होते. हातात काठी न घेता, आवाज न चढवताही समोरच्याला वावगे वागू न देण्याची सरांची विलक्षण हातोटी होती.

शिक्षक बनताच माझ्या मनात सरांप्रमाणेच प्रेमळ, व्यासंगी, विद्यार्थिप्रिय, हातात काठी न घेणारी, आदर देणारी अन् आदर घेणारी, आदर्श शिक्षिका बनण्याची जी इच्छा रुजली आहे, तसे बनण्याचा जो मी प्रयत्न करत आहे, त्याला बळ मिळो याच आशिषाची सरांकडे माझी प्रार्थना राहील.

 • अर्चना उमेश कोदे
  (आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शिक्षिका )
  पत्ता : मु. पो. कांदळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०६
  मोबाइल : ९४२०८ २२५५२
  …..
  (पुढचा लेख कल्पना मलये यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply