मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमात शहापूरच्या महिलेचा संवाद

ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे गेल्या वर्षी भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे शहापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

शहापूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांपैकी जानकीबाईंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गटशेतीचे महत्त्व पटवून दिले, असे ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले. याआधी रानभाज्या विकून या शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह होत असे. कृषी विभागाने त्यांना ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमात सहभागी करून घेतले. यंदा त्यांच्या रानभाज्यांचे प्रदर्शन कल्याण व ठाणे येथे भरविले. त्यातून २० हजार रुपयांच्या रानभाज्यांची विक्री झाल्याचे बगळे यांनी मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगितले.

गटशेती केल्यामुळे आर्थिक फायदा होत आहे. आता त्यांच्या गटाकडून जिल्ह्यातील शहरांना ताजा भाजीपाला आणि रानभाज्या पुरवण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

जानकी तुकाराम बगळे शहापूरजवळील अंदाडच्या रासदो पाडा येथे राहतात. रानभाज्या वाळवून, सुकवून त्या २० वर्षांपासून विकत आहेत. रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्त्व शहरी भागात पटवून दिल्यामुळे त्यांचे ग्राहक वाढले आहेत. त्यांचा १०० एकरचा गट आहे. एका कंपनीशी संलग्न होऊन हा गट गटशेती करतो. त्यापैकी ७० एकरच्या गटात त्या भेंडी, काकडी, कारले, दोडके, मिरची, मेथी, वांगी आदी भाजीपाला व रानभाज्यांचे उत्पादन करतात. वर्षाकाठी लाखभर रुपये फायदा त्यातून होत आहे. या गटशेतीमुळे त्यांनी तीन शेततळी मंजूर झाले आहेत. त्यांना दोन ट्रॅक्टर विकत घेता आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply