माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १२ (मसुरे मार्गाचीतड शाळेतील प्रभाकर गुरुजी)

प्रभाकर गुरुजी

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १२वा लेख आहे शिवराज सावंत यांचा… मसुरे मार्गाचीतड (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जि. प. शाळेतील प्रभाकर मुकुंद मसुरेकर यांच्याबद्दलचा…
………
जि. प. शाळा मसुरे-मार्गाचीतड ही माझी शाळा. माझा शाळेचा पहिला दिवस शेवटचा ठरावा असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झाला आणि माझी शाळा सुटली. माझ्या सुदैवाने पाच-सहा महिन्यांनी प्रभाकर गुरुजी आमच्या शाळेत बदली होऊन आले आणि दुसऱ्याच दिवशी ते आमच्या घरी आले. त्यांनी मला जवळ बोलावले, ‘अरे शिवा तू आत्ता माझ्यासोबत शाळेत चल बघू. छान शिकून मोठ्ठं व्हायचंय ना तुला!’ त्यांचा तो पांढराशुभ्र सदरा, लेंगा आणि गोरेपान रुबाबदार व्यक्तिमत्त्व बघून मला ते माझ्या मनातले गुरुजी वाटले. पटकन दप्तर भरून मी त्यांच्याबरोबर शाळेत गेलो, तो चार वर्षं त्यांचाच बनून गेलो.

विद्यार्थ्यांची गळती हा प्रकार त्या काळात प्रभाकर गुरुजींसारखे शिक्षक घडूच देत नसत. कदाचित त्या दिवशी गुरुजी मला घरी न्यायला आलेच नसते. मी शाळेत गेलोच नसतो, तर आज मिळणारा मानसन्मान मला मिळाला असता का? आज आठवलं तरी मन गलबलतं.

प्रभाकर गुरुजींचं आडनाव मसुरेकर; पण सर्व जण त्यांना प्रभाकर गुरुजीच म्हणत. मी चौथीमध्ये असतेवेळी गटशाळेत परीक्षा झाली. एक दिवस मी गुरुजींना म्हणालो.. ‘पहिला नंबर कोणाचा आला?’ ते म्हणाले, ‘अरे शिवा तुझाच नंबर असणार! तुझ्याशिवाय कोणाचा नंबर येणार?’ निकाल काय लागला, माझा नंबर आला होता का, हे मला शेवटपर्यंत समजलं नाही; पण त्यांचे कौतुकाचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात आणि नवीन काही तरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.

श्रीमती मॅथ्यू बेथल या महिलेने कृष्णवर्णीयांसाठी शाळा काढली. त्या शाळेच्या प्रवेशद्वारावर दोन वाक्यं लिहिली होती… Enter to learn & Go to serve… मला मात्र ही दोन वाक्यं प्रभाकर गुरुजींच्या हृदयातच कोरलेली असावीत असा भास व्हायचा. आज मुलांअभावी ही शाळा बंद पडली आहे. शाळेजवळून जात असतेवेळी मनाला यातना होतात आणि मनात येतं, ‘आज प्रभाकर गुरुजी असते तर त्यांनी ही शाळा बंद पडायला दिलीच नसती….!’

 • शिवराज विठ्ठल सावंत
  (राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक; जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मालवण दांडी येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत; लेखक)
  पत्ता : मु. पो. मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०८
  मोबाइल : ९४२२९ ६४१७३
  …..
  (पुढचा लेख विद्यानंद परब यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply