माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १९ (भायखळा अप्पर प्रायमरी स्कूलमधील माळगावकर मॅडम)

माळगावकर मॅडम

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १९वा लेख आहे भानू तळगावकर यांचा… भायखळा (मुंबई) येथील अप्पर प्रायमरी स्कूलमधील शिक्षिका माळगावकर मॅडम यांच्याविषयीचा…
………
माझी सातवीपर्यंतची शाळा म्हणजे पूर्व भायखळा अप्पर प्रायमरी स्कूल. या शाळेचे पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया गार्डन प्रायमरी स्कूल असे होते. या शाळेत मी १९५९ ते १९६६ या कालावधीत शिकलो. या शाळेत माझ्यावर चांगले संस्कार घडविणारे शिक्षक म्हणजे मुणगेकर सर (इतिहास), हडकर सर (चित्रकला) (मिठबाव). माझ्यावर जास्त प्रभाव पडला तो श्रीमती हिरा भिकाजी माळगावकर बाईंचा. (काळसे-मालवण)

शिक्षिका म्हटले, की मातृहृदय, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी ठरलेल्या. अवगुणी, खट्याळ, अभ्यासात हलगर्जीपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसंगी रागे भरणाऱ्या अशा आमच्या माळगावकर मॅडम! आम्हाला मराठी, गणित, हिंदी हे विषय हसत-खेळत सहज समजतील अशा पद्धतीने अध्यापन करीत. त्यांनी साभिनय सांगितलेल्या कथा, कविता अजूनही स्मरतात. त्यांच्या आवाजाचा आदरयुक्त धाक वाटायचा. मॅडम साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा मताच्या होत्या. नऊवारी साडीमध्ये त्या आईसमान भासायच्या. स्वभावात गोड आणि तापटपणाचा नमुनाही पाहायला मिळायचा.

त्या काळात मुलांना रोज ‘आरे’चे दूध मिळायचे. २५० मिलिची काचेची बाटली असायची. एकदा सर्व मुले रांगेने दूध बाटली घेत असताना एका खट्याळ मुलाने पुढच्या मुलांना जोराचा धक्का दिला. दोन मुलांच्या हातातील बाटल्या फरशीवर पडल्या, काचा चौफेर विखुरल्या. माळगावकर मॅडम त्या मुलांवर फार संतापल्या; पण नंतर त्या मुलाला शिस्तीबाबत समजावले.

सहल म्हटले, की आम्हाला कोण आनंद व्हायचा! त्या काळात मुंबईतील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहावयास मिळाली. म्युझियम, गेट वे ऑफ इंडिया, तारापोरवाला मत्स्यालय, हँगिंग गार्डन, पवई तलाव, वसईचा किल्ला, वज्रेश्वरी आणि म्युझियमजवळील जहांगीर आर्ट गॅलरी. आजही मुंबईस गेल्यावर आवर्जून गॅलरीस भेट देतो.

शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून मॅडम १९८६ला सेवानिवृत्त झाल्या. योगायोगाने १९९६मध्ये त्यांची गटसंमेलनाच्या निमित्ताने काळसे नं. एक शाळेत भेट झाली. त्यांनी मला एवढीच ओळख करून दिली, की त्या मुंबईतील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. आपल्या संमेलनास सहज भेट दिली आहे. मी माझ्या प्रास्ताविकात सहज उल्लेख केला, की या मॅडमसारख्याच मला मुंबईला व्हिक्टोरिया गार्डन शाळेत माळगावकर मॅडम शिकवायला होत्या. मॅडमना या आठवणीने आनंदच झाला. ४० वर्षांनीही एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेची गोड स्मृती जपतो, याचे त्यांना कौतुक वाटले. आज मॅडम ९२ वर्षांच्या आहेत. आदरणीय माळगावकर मॅडम तुम्हाला शतशः प्रणाम!

– भानू दाजी तळगावकर
(माजी केंद्रप्रमुख, लेखक)
पत्ता : चंदाय सदन, ४४५, पहिली वाडी, पडवे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६ ५३४
मोबाइल : ९४२२० ५९४४२
…..
(पुढचा लेख रामचंद्र आंगणे यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply