कवितेचा ‘फुल बॅलन्स’ असलेले आ. सो. शेवरे (सिंधुसाहित्यसरिता – १)

आ. सो. शेवरे (१५ जुलै १९४६ – २६ ऑक्टोबर २०१६)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा पहिला लेख… कवी आ. सो. शेवरे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे कल्पना मलये यांनी…
………
‘झीरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक’ हा कवितासंग्रह लिहिणाऱ्या आबांचं साहित्यप्रतिभेचं पासबुक मात्र फुल होतं. आबांचे एकूण चार कवितासंग्रह आहेत. ‘गांधारीची फुले’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९८३ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘दफनवेणा’ १९९६ साली. ‘झीरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक’ आणि ‘अंधारातला जागल्या’ हे त्यांचे शेवटचे दोन कवितासंग्रह.

आ. सो. शेवरे तथा आबा यांचा जन्म कोर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) या अतिदुर्गम खेडेगावात झाला. त्यांचा बराचसा आयुष्यकाल याच खेडेगावात गेला. गरिबीत जन्मलेल्या आबांचं आयुष्य गरिबीतच संपलं. सोबतच त्यांनी जातिव्यवस्थेचे चटके सहन केले. त्यातूनच आबांची कविता फुलत गेली. आबांनी कविता लिहिली ती केवळ सामाजिक बदल व्हावा या अपेक्षेने. त्यामुळेच ‘गांधारीची फुले’ हा आबांचा पहिला कवितासंग्रह १९८३ साली प्रकाशित झाला, त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी ‘दफनवेणा’ हा दुसरा कवितासंग्रह १९९६ साली प्रकाशित झाला. कोणताही चांगला कवी पुस्तक प्रकाशनाची घाई करत नाही.

आबा हे विद्रोही कवी. परंतु आबांचा विद्रोह विधायक होता. त्यामुळे त्यांची कविता नेहमी बुद्धधम्माच्या दिशेने वाटचाल करते. अमानवी कृती बंद होऊन माणसाचं माणसात रूपांतर व्हावं यासाठी आबा नेहमी आग्रही राहतात. आबांच्या कवितांचा अभ्यास केला, तर निश्चिमतपणे आपल्या लक्षात येतं, की आबा समानतावादी समाजरचनेची अपेक्षा करतात. आबांच्या मते स्त्री व पुरुष हे दोन नाहीत, तर मानव हा एकच वर्ग आहे. आबांनी आपले कवितासंग्रह आपली आई, आपली पत्नी व नात यांना अर्पण केले आहेत. आबा स्त्रियांना उच्च स्थान देतात. आबांच्या मते स्त्री आणि पुरुषांमध्ये केवळ देहाचा भेद आहे. त्यामुळे त्यांना स्त्रियांवर होणारे अत्याचार अमान्य आहेत.

आबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली कविता जपली. आबांची कविता कोणत्याही एका बंधनात बांधता येणार नाही. अनेक विषयांवर आबांनी कविता लिहिली. आबा आपली कविता स्त्रीच्या प्रसववेदनेशी जोडतात.

मेणबत्तीचा तुकडा
शोधता-शोधता
कविता ललाटी लागली
आणि भूमीला
भूकंपाचा हादरा बसला
लाइट डिम
दिवा गुल
अंधारातच कापली नाळ कवितेची

आबा आपल्या कवितानिर्मितीच्या प्रक्रियेला प्रसववेदना म्हणतात आणि खरोखरच प्रचंड प्रसववेदना सहन करूनच आबांनी कविता लिहिली. आबांनी अस्पृश्यतेचे चटके जन्मापासून सोसले. त्यातूनच त्यांचा जगण्याचा संघर्ष उभा राहिला. त्यांच्या लेखणीला धार आली. आबांनी आपल्या लेखणीतून जातिव्यवस्थेला रोखठोक प्रश्न विचारले आहेत. आबा स्वतः स्त्रियांना उच्च स्थान देत होते. परंतु आबांना याचीही जाणीव होती, की समाजात स्त्रीची घुसमट होत आहे. त्यामुळे आबा स्त्रीकडूनच अपेक्षा करतात, की तिनं मुक्त व्हावं आणि सगळी बंधनं मोकळी करावीत आणि स्वतःचा विकास करावा.

चार भिंतींच्या आत घुसमटणं सोडून दे
थोडी मैदानात मोकळ्या हवेत खुलून ये
पिंगाणी भिरभिरत येतात
तू तशी येत जा
उमलत चाफेकळीसारखी

आबांच्या कवितांमध्ये निसर्गातील घटकदेखील अगदी सहजतेनं येतात. कारण आबांचं गाव निसर्गसंपन्न आहे. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी विंदा करंदीकर यांचंही हे गाव. निसर्गसंपन्न असलेल्या या गावातच आबांची कविता फुलली.

शहराच्या मध्यभागी आल्यावर
थरथरतात खेडी
झाडांच्या सावलीत माणसे
गर्दीच्या सावलीत गळागच्च बुडून जाताना खेडी घुसमटतात

आबांचा जीव शहरामध्ये रमला नाही. आबा बुद्ध विचाराने प्रेरित झालेले होते. पृथ्वी कष्टकऱ्यांच्या श्रमावर अवलंबून उभी आहे या विचारसरणीवर आबांचा विश्वास होता. आबा परिवर्तनवादी कवी होते. आबांनी सम्यक साहित्य संसदेची स्थापना केली. उत्तम पवार, संध्या तांबे, सुनील हेतकर, सिद्धार्थ तांबे, अनिल जाधव, अरुण नाईक, मधुकर मातोंडकर यांसारखे अनेक बिनीचे शिलेदार त्यांनी घडवले. ‘प्रसंवाद’सारखं अनियतकालिक सुरू करून त्यांनी कोकणातल्या कवींना एक हक्काची जागा मिळवून दिली. अत्यंत खडतर अवस्थेत अनियतकालिक नेटानं सुरू ठेवलं. आबांनी घडवलेले अनेक कवी समाजजागृतीचं कार्य करत आहेत.

एक किडकिडीत, कृश देहयष्टीचा माणूस समाजपरिवर्तनाच्या अपेक्षेने कविता लिहितो, सातत्यानं होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो, स्वतः गरिबीचे चटके सहन करून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करून ठेवतो, वाट्याला आलेल्या दुःखाची किंचितही तमा न बाळगता कार्य करत राहतो, स्त्री-शक्तीला ओळखून कवितांमधून स्त्रीची प्रतिमा अधिक सहज आणि सक्षम करतो, माणूस घडवण्याची कामगिरी स्त्रीच्या हाती सोपवतो, त्या वेळी हा कवी हृदयात कायमचं घर करून राहतो.

मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते बा. सी. मर्ढेकर पुरस्कार स्वीकारणारे, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात साध्या पोशाखात राहून दर्जेदार कविता सादर करणारे आबा हातात ‘गांधारीची फुले’ आणि ‘झीरो बॅलन्स असलेले पासबुक’ घेऊन कवितेच्या ‘दफनवेणा’ सोसत अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा देत ‘अंधारातला जागल्या’ बनून अजूनही उभे आहेत तिथेच.

– कल्पना धाकू मलये
(लेखिका, कवयित्री; मुख्याध्यापिका, जि. प. शाळा कणकवली क्र. ५ आणि ४)
पत्ता : शिवाजीनगर, मु. पो. ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
मोबाइल : ९६७३४ ३८२३९
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. आ. सो. शेवरे कोकणातील परिवर्तनवादी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. निखळ आंबेडकरवादी साहित्य संमेलनांचे प्रवर्तक म्हणूनही त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. त्यांनी सिंधुदुर्गच्या वाङमयीन काव्येतिहासात विद्रोही कविता लिहून पुरोगामी विचार रुजविला व महाराष्ट्रभर आपल्या कवितेचं नाणं खणखणीत आवाजात वाजवलं. शेवरेंची कविता निखळ माणूसपणाचे गीत गाणारी असूनही दुर्लक्षित राहिली. सृजनाच्या पातळीवर श्रेष्ठ ठरणारे शेवरेंचे काव्यसंग्रहाची मराठी समीक्षकांनी दखल न घेणं म्हणजे बाळंतपणानंतर मुलगी पाहून तिचा निकाल लावण्यासारखी घटना आहे. कल्पना मलये यांनी घेतलेला हा आढावा निश्चितच आबांच्या स्मृती जागृत करणारा आहे.

Leave a Reply