
मालवण : ‘कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे सर्वच उपक्रम साहित्यिक व्यासंगाचा वारसा जपणारे असतात. ‘सिंधुसाहित्यसरिता’ ह्या साहित्यिक उपक्रमातून प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या सिंधुदुर्गातील लेखकांचा परिचय मराठी मनाला होईल! या उपक्रमाचा शुभारंभ साहित्यरसिक असलेल्या बॅ. नाथ पै जयंतीदिनी माझ्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान वाटतो,’ असे गौरवोद्गार गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांनी २५ सप्टेंबर २०२० रोजी काढले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने आयोजित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ ह्या लेखमालेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात झाले. त्या वेळी ते बोलत होते.
सिंधुदुर्गातील अनेक नामवंत साहित्यिकांचे साहित्य अत्यंत दर्जेदार असूनही ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकले नाहीत. अशा साहित्यिकांची ओळख करून देणारे लेख सिंधुसाहित्यसरिता या उपक्रमात लिहिले जाणार आहेत. ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे आजीव सभासद हे लेख लिहिणार आहेत. हे सर्व लेख kokanmedia.in या वेबसाइटच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहेत. २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत दररोज या मालिकेतील एक लेख प्रकाशित केला जाणार आहे. ही लेखमाला ज्ञानपीठविजेते कोकणपुत्र आदरणीय वि. स. खांडेकर आणि आदरणीय विंदा करंदीकर यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आली आहे.
सिंधुसाहित्यसरिता उपक्रमाच्या पहिल्या मालिकेत वीस निवडक साहित्यिकांना स्थान देण्यात आले आहे. साहित्यिक आ. सो. शेवरे, वसंत आपटे, प्रतिभा आचरेकर, पां. ना. मिसाळ, ल. मो. बांदेकर, डॉ. विद्याधर करंदीकर, आ. द. राणे, जी. टी. गावकर, विद्याधर भागवत, विजय चिंदरकर, आ. ना. पेडणेकर, श्रीपाद काळे, बाळकृष्ण प्रभुदेसाई, वसंत सावंत, परशुराम देसाई, लुई फर्नांडिस, हरिहर आठलेकर, वसंतराव म्हापणकर, जनयुगकार खांडाळेकर, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आदी साहित्यिकांचा त्यात समावेश आहे. अनुक्रमे कल्पना मलये, उज्ज्वला धानजी, शीतल पोकळे, ऋतुजा केळकर, सुजाता टिकले, माधव गावकर, श्रद्धा वाळके, सुगंधा गुरव, वैजयंती करंदीकर, तेजल ताम्हणकर, शिवराज सावंत, मधुरा माणगावकर, उज्ज्वला सामंत, उमेश कोदे, सदानंद कांबळी आणि सुरेश ठाकूर हे सदस्य लेखन करणार आहेत.
या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांची आहे. या उपक्रमाबद्दल ते म्हणाले, ‘आज बॅ. नाथ पै यांची जयंती आहे. ते साहित्याचे खरे भोक्ते होते. सिंधुदुर्गातील साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, चिं. त्र्यं. खानोलकर आदी अनेकांबाबत त्यांना सार्थ अभिमान होता. सात नोव्हेंबर १९७० रोजी महाबळेश्वर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या जन्मदिनी सुरू होणारी ही लेखमालिका त्यांच्या साहित्यिक रसिकतेला उजाळा देणारी ठरेल.’

सुरेश ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन’ या नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाचे वर्णन करणाऱ्या विशेष लेखाचे प्रकाशन या कार्यक्रमात रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते झाले. (हा लेख कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाला असून, तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
या उपक्रमाला ज्येष्ठ मालवणी कवी आणि केंद्रीय कोमसाप समिती सदस्य रुजारिओ पिंटो यांनी शुभेच्छा दिल्या. ही लेखमाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरूनही प्रसिद्ध होणार आहे.
…..
(सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
……..
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड