देवरूखची ग्रामदेवता देवी सोळजाईचे महिमा गीत लवकरच भाविकांच्या भेटीला

देवरूख : देवरूखची (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) ग्रामदेवता श्री देवी सोळजाईचा महिमा सांगणारे गीत देवरूखमधील युवक तयार करत आहेत. नवरात्रौत्सवात हे गीत भाविकांसमोर येणार आहे.

देवरूखसह ४४ खेड्यांची आणि १८ गावांची मालकीण म्हणून श्री देवी सोळजाईची ख्याती आहे. नवसाला पावणारी असा तिचा महिमा आहे. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सोळजाई मंदिरात सुरू असतात. (अधिक माहितीचा व्हिडिओ शेवटी पाहा.)

श्री देवी सोळजाईचा महिमा गीतामधून आणि चित्रीकरणातून भाविकांसमोर यावा, अशी संकल्पना संगीतकार दीपक पवार आणि नृत्य दिग्दर्शक समीर महाडिक यांनी मांडली. त्यावर काम करायचे असे दोघांनी ठरवले.

सोळजाईचा महिमा गीतातून व्यक्त व्हावा, यासाठी कवी प्रभाकर जयराम डाउल यांनी सुंदर गीत लिहिले. त्याला दीपक पवार यांनी संगीत आणि समीर महाडिक यांनी नृत्य, तसेच सादरीकरणाची जोड दिली. हे विशेष गीत पुण्यातील युवा गायक विशाल मोहिते यांच्याकडून दीपक पवार यांनी गाऊन घेतले. हे गीत अष्टविनायकाच्या महिमागीताप्रमाणे भाविकांमध्ये लोकप्रिय होणार असल्याची खात्री पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी सांगितले, की या गीतातून सोळजाई देवी मंदिरात जे जे सणवार, उत्सव साजरे होतात, ते चित्रीकरणाच्या माध्यमातून भाविकांसमोर येणार आहेत. दीपक पवार, प्रभाकर डाउल यांच्यासह २५ जणांच्या चमूने त्यासाठी मेहनत घेतली आहे. गीताचे शब्द आणि त्याला जोडून त्या त्या प्रसंगाचे झालेले चित्रीकरण याद्वारे सोळजाईचा महिमा सांगितला जाणार आहे.

श्री क्षेत्र मार्लेश्वराप्रमाणेच श्री देवी सोळजाईचा महिमा सर्वदूर पोहोचलेला आहे. या गीतात देवस्थानचा शिमगोत्सव, शिंपणे उत्सव, लोटांगण सोहळा असे प्रसंग चित्रित झाल्याने कारखानदार, कुमकर, ट्रस्टी, भाविक सुखावले आहेत. करोना काळात निर्बंध आल्याने निर्मिती प्रक्रियेला वेळ लागला, असेही श्री. गांधी यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply