रोटरी, लायन्स क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना मोबाइलचे वाटप

रत्नागिरी : येथील रोटरी क्लब आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक मोबाइल देण्याचा सामाजिक उपक्रम एकत्रितरीत्या राबविण्यात आला.

करोनाच्या संकटामुळे शाळा अजूनही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; मात्र अनेक मुलांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ते शिक्षणप्रवाहापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी त्यांना मोबाइल देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने रत्नागिरीच्या रोटरी क्लबने पुढाकार घेतला. जुने, पण वापरात असलेले मोबाइल दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संकलित झालेल्या मोबाइलचे वितरण शिर्के प्रशालेत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. या उपक्रमाला लायन्स क्लबचेही योगदान लाभले. प्रमोद कोनकर, श्रद्धा कळंबटे, सचिन शिंदे, प्रकल्प आराध्ये, श्रेया केळकर, मनोज पाटणकर यांनी या उपक्रमासाठी मदत केली.

मोबाइल वितरणाच्या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज पाटणकर, सचिव परेश साळवी, खजिनदार ऋता पंडित, सदस्य विनायक हातखंबकर, मंदार सावंतदेसाई, जयेश काळोखे आणि सचिन सारोळकर, लायन्स क्लबच्या अध्यक्ष सौ. श्रेया केळकर आणि सौ. पानवलकर उपस्थित होत्या. शिर्के महाविद्यालयाचे श्री. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात तोणदे, काळबादेवी, नाणिज, केळ्ये जिल्हा परिषद शाळा, रत्नागिरीतील दामले विद्यालय, आविष्कार, मूकबधिर विद्यालय, शिर्के प्रशाला, अ. के. देसाई हायस्कूल, परशुराम अभ्यंकर प्राथमिक विद्यालय, मेस्त्री हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोबाइल देण्यात आले. या उपक्रमासाठी मारुती मंदिर येथील कीर्ती सेल्सचे बहुमोल सहकार्य मिळाल्याचे मनोज पाटणकर यांनी सांगितले. आता ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील. त्यामुळे शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया संबंधित विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालक व शिक्षकांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply